विजयी अन् पराभूतांना ऑनलाईन खर्च सादर करणे ठरतेय त्रासाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:56+5:302021-02-05T07:37:56+5:30
चिमूर : ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक आयोगाने यंदा पारंपरिक (ऑफलाईन) खर्च सादर करण्याच्या पद्धतीला फाटा देऊन उमेदवारांना ऑनलाईन खर्च सादर ...

विजयी अन् पराभूतांना ऑनलाईन खर्च सादर करणे ठरतेय त्रासाचे
चिमूर : ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक आयोगाने यंदा पारंपरिक (ऑफलाईन) खर्च सादर करण्याच्या पद्धतीला फाटा देऊन उमेदवारांना ऑनलाईन खर्च सादर करण्यासाठी ॲप विकसित केले आहे. उमेदवारांसाठी ते डोकेदुखी ठरत असून अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे निवडणूक खर्च ऑफलाईन स्वीकारावा, अशी मागणी होत आहे.
आधीच ऑनलाईन अर्जाच्या ससेमिऱ्याने वैतागलेल्या उमेदवारांना आता ऑनलाईन खर्च सादर करताना डोकेदुखी ठरत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मोबाईलमध्ये ऑनलाईन टू वोटर ॲप डाऊनलोड करून त्यात खर्च सादर करावा लागत आहे. जिल्ह्याची परिस्थिती पाहता ऑनलाईन खर्च सादर करणे म्हणजे उमेदवारांसाठी तारेवरची कसरत आहे. निवडणुकीत उभे असलेल्या काही उमेदवारांकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल नाही. तसेच आयोगाचे हे ॲप नवीन व्हर्जनच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होत आहे.
उमेदवार सातवी पास असले तरी काही उमेदवारांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्याकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल नाही. शिवाय त्यांना त्यातले एवढे ज्ञान नसल्याने खर्च कसा सादर करायचा, या विवंचनेत उमेदवार आहेत. जिल्ह्याची परिस्थिती पाहता काही भाग अतिदुर्गम भागात मोडतो. त्यामुळे त्या ठिकाणी रेंज नसल्याने अवघड होत आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचणी आल्याने शेवटच्या दिवशी ऑफलाईन पद्धतीने अर्जांचा भरणा करण्यात आला होता. याच प्रकारे प्रशासनाने खर्च सादर करण्यासंदर्भात मुभा द्यावी अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
बॉक्स
या आहेत अडचणी
‘ट्रू वोटर ॲप’ हे एका मोबाईलवर इन्स्टॉल केल्यानंतर दुसऱ्या मोबाईलवर उमेदवाराचा नंबर वापर करता येणार नाही. कारण फक्त एकाच मोबाईलचा नोंदणी क्रमांक एका व्यक्तीकरिता करण्याची व्यवस्था आहे. शिवाय मोबाईलमध्ये भरपूर स्पेस असणे आवश्यक आहे. हे ॲप इन्स्टॉल करण्याअगोदर संबंधित उमेदवाराने ऑनलाईन नामनिर्देशन अर्ज भरलेला असणे आवश्यक आहे. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या ॲन्ड्रॉईड मोबाईलवर हे ॲप इन्स्टॉल करून त्यात खर्च भरावा लागणार आहे. दरम्यान ऑनलाईन नामनिर्देशन अर्ज भरताना वेबसाईट हँग होणे या समस्या जाणवल्या. त्यामुळे आयोगाने अखेरच्या दिवशी ऑफलाईन अर्ज स्वीकारले. आता ज्या उमेदवारांनी ऑनलाईन नॉमिनेट दाखल केले नाही त्यांनी काय करावे हा प्रश्न उपस्थित होत आहे.