‘तो’ शाळा व गावासाठी ठरला मैलाचा दगड
By Admin | Updated: June 21, 2017 00:45 IST2017-06-21T00:45:47+5:302017-06-21T00:45:47+5:30
१५ ते २० घरांची लोकवस्ती, सभोवताल पूर्णत: झुडपी जंगल. गावात व घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नाही.

‘तो’ शाळा व गावासाठी ठरला मैलाचा दगड
परिस्थितीवर मात : रानपरसोडीच्या विद्यार्थ्याचे नेत्रदीपक यश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : १५ ते २० घरांची लोकवस्ती, सभोवताल पूर्णत: झुडपी जंगल. गावात व घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नाही. मात्र शाळेतील मार्गदर्शनावर त्याने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण प्राप्त करून शाळेसाठी आणि गावासाठी ‘तो’ मैलाचा दगड ठरला. नागभीडपासून १५ किमी अंतरावर असलेल्या रानपरसोडी येथील प्रणय प्रकाश ऊईके या गरीब विद्यार्थ्यांची ही प्रगती आहे.
प्रणयचे वडिल मिस्त्रीचे काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवतात. तर आई मोलमजुरी करून कुटुंबाला मदत करते. अशाही परिस्थितीत आपल्या मुलाने शिकावे व आपले नाव मोठे करावे, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. प्रणय नवेगाव पांडव येथील धर्मराज कन्या विद्यालयाचा विद्यार्थी आहे. जन्मजात कुशाग्रबुद्धी असलेल्या प्रणयची भरारी शाळेच्या शिक्षकांच्या लक्षात आली आणि त्यांनी प्रणयवर लक्ष केंद्रीत केले. प्रणयने सुद्धा शिक्षकांच्या सुचनांनुसार अभ्यास केला व दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण प्राप्त केले. शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे गुण जरी कमी असले तरी प्रणयने परिस्थितीशी दोन हात करत, झोपडीत राहून, कोणतीही शिकवणी न लावता केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनावर जे यश प्राप्त केले, त्या यशाला खरोखरच मोल नाही, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
रानपरसोडीचे आजवर अनेक विद्यार्थी शिकले व मोठे झाले. धर्मराज कन्य विद्यालयातूनही हजारो विद्यार्थ्यांनी आजवर परीक्षा दिली, उत्तीर्ण झाले. नोकरीलाही लागले पण प्रणयचे यश गावासाठी व शाळेसाठी मैलाचा दगड ठरले असल्याची प्रतिक्रिया शाळेच्या मुख्याध्यापिका पपीता चावरे यांनी व्यक्त केली.