गावतलावात बंधाऱ्यातील पाणी सोडल्यास सिंचन क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:29 IST2021-01-25T04:29:01+5:302021-01-25T04:29:01+5:30

टेकाडी गावात मृदु व जलसंधारण विभागाच्या अतिरिक्त सचिवाची भेट मूल : बंधाऱ्यातील पाणी गावतलावात सोडल्यास धान ...

Irrigation revolution if water is released from the dam in the village pond | गावतलावात बंधाऱ्यातील पाणी सोडल्यास सिंचन क्रांती

गावतलावात बंधाऱ्यातील पाणी सोडल्यास सिंचन क्रांती

टेकाडी गावात मृदु व जलसंधारण विभागाच्या अतिरिक्त सचिवाची भेट

मूल : बंधाऱ्यातील पाणी गावतलावात सोडल्यास धान पिकासोबतच विविध पर्यायी पिके घेता येतात. त्यामुळे नवीन आर्थिक क्रांती घडवून आणता येऊ शकते, असा आत्मविश्वास शेतकऱ्यांना झाल्याने टेकाडी येथे आलेल्या मृदु, जलसंधारण व रोजगार हमी योजनेचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. नंदकुमार यांना निवेदन देवून तशी मागणी केली.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मूल तालुक्यातील टेकाडी या गावातील मुख्य व्यवसाय शेती असून धान पिकासोबत इतर पिके घेण्यात शेतकरी प्रयत्नरत आहेत. मात्र, धान पीक काढल्यानंतर इतर पिकांसाठी पाणी नसल्याने मनात तळमळ असतानासुध्दा पीक घेता येत नसल्याचे दिसून येते. यासाठी प्रयत्नरत असताना मृदु, जलसंधारण व रोजगार हमी योजनेचे अतिरिक्त मुख्य सचिव डी.नंदकुमार येत असल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बंधाऱ्यातील पाणी गावतलावात सोडल्यास परिसरातील शेतकऱ्यांना बारमाही पाण्याचे स्रोत निर्माण होण्यास मदत होइल. या पाण्याचा उपयोग निरनिराळे उत्पन्न घेण्यास मदत होऊ शकते. ही बाब विविध उदाहरणाने यावेळी पटवून देण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव डी.नंदकुमार यांच्यासमवेत रोजगार हमी योजनेचे आयुक्त शंतनू गोयल, नागपूरचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी एन.डी.सहारे ,जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले आदींनी शेतकऱ्यांची समस्या समजून घेतली. निवेदन देताना येथील शेतकरी किसन गुरुनुले, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सतीश चौधरी, शंकर सिडाम ,अमित घडसे, संजय पोटवार, लीना गोवेर्धन आदी उपस्थित होते.

Web Title: Irrigation revolution if water is released from the dam in the village pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.