जिल्हा बँकेच्या कामात अनियमितता

By Admin | Updated: May 21, 2016 00:50 IST2016-05-21T00:50:32+5:302016-05-21T00:50:32+5:30

येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडत शुक्रवारी बँकेचे संचालक रवींद्र शिंदे व डॉ.विजय देवतळे

Irregularities in the work of the District Bank | जिल्हा बँकेच्या कामात अनियमितता

जिल्हा बँकेच्या कामात अनियमितता

संचालकांचा आरोप : अध्यक्षांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह
चंद्रपूर : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडत शुक्रवारी बँकेचे संचालक रवींद्र शिंदे व डॉ.विजय देवतळे यांनी पत्रकार परिषदेत बँकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावले.
चंद्रपूर जिल्हा शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांच्या कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेला रवींद्र शिंदे, डॉ.विजय देवतळे यांच्यासह उल्हास करपे, नंदा अल्लूरवार व प्रकाश तोटावार प्रामुख्याने उपस्थित होते. या संचालकांनी बँकेच्या पाच कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. यासंदर्भात सहकार निबंधक व राज्य शासनाकडे करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या तक्रारीनंतर संचालकांवर सहकार अधिनियमाच्या कलम ८३ अन्वये कार्यवाही सुरू झाल्याची माहितीही यावेळी पत्रकारांना देण्यात आली. या प्रकारामुळे बँकेवर प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्यताही रविंद्र शिंदे व डॉ.विजय देवतळे यांनी व्यक्त केली. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
रवींद्र शिंदे म्हणाले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांची सध्या मनमानी सुरू आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या ८२ शाखांपैकी ५० ते ६० शाखा तोट्यात आल्या आहेत. बँकेचा एनपीए वाढून तो १३.५५ टक्क्यावर पोहोचला आहे. ते पुढे म्हणाले, सुरक्षा रक्षक भरतीमध्ये नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे.
संगणक, हार्डवेअर, सॉफ्टवेअर खरेदीत भ्रष्टाचार करताना हे साहित्य सिद्धेश एंटरप्राईजेस नामक कंपनीकडून खरेदी करण्यात आले आहे. या कंपनीचा कुठेच ठावठिकाणा नाही.
एटीएम खरेदीतही भ्रष्टाचार झाला असून खरेदी करण्यात आलेले एटीएम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यातील अनेक एटीएम बंद पडले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
सोन्याची शुद्धता तपासणारे यंत्र खरेदी करण्यात आले. मात्र यंत्राच्या खरेदीतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप शिंदे यांनी केला. कोणतीही गरज नसताना स्थानिक रेणुका पेपर अ‍ॅन्ड प्रिंटर्सला फायदा व्हावा यासाठी एका महिन्यात ३४ शाखांसाठी ९ लाख २२ हजार ४७ रुपये अदा केले. बँकेचे नामफलक तयार करण्याची किंमत २७ हजार ९९९ रुपये बँकेकडून देण्यात आली आहे. हा भाव बाजारभावापेक्षा खूप अधिक आहे. बँकेच्या वतीने पोंभुर्णा शाखेसाठी बाजार भावापेक्षा अधिक किमतीमध्ये जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोपही यावेळी शिंदे यांनी केले. गंभीर बाब ही की, बँकेने घेतलेल्या अधिकांश निर्णयांच्या कागदावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत. कोणताही निर्णय घेताना संचालकांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे बँकेच्या अध्यक्षांकडून होत असलेला भ्रष्टाचार जनतेपुढे आणण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नव्हता, असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

सर्व आरोप बिनबुडाचे-मनोहर पाऊणकर
बँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांच्यासह अन्य संचालकांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला. ते म्हणाले, राजकारणातून हे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या मनाप्रमाणे कामे होत नसल्यामुळे तसेच त्यांच्या मर्जीतील लोकांच्या बदल्या करण्यात आल्याने त्यांनी बँकेवर आरोप लावले आहेत. रक्षक सिक्युरिटी सर्व्हीसचा मुद्दा किंवा सिद्धेश एन्टरप्राईजेसचा मुद्दा असो कागदपत्रांच्या पुर्ततेनंतरच त्यांना कंत्राट देण्यात आले. हिताची पेमेंट सर्व्हीसला निविदेच्या अनुसारच आदेश देण्यात आले. संगणक व तांत्रिक सल्लागारांच्या निरीक्षण अहवालानंतर त्यांना पैसे देण्यात आले नाहीत. माहुली ट्रेडिंग कंपनीला देण्यात आलेले पुरवठ्याचे आदेश रद्द करण्यात आले आहे. बँकेच्या नियमानुसारच समिती, उपसमिती गठित करण्यात येते.मात्र ज्यांना हे सर्व चुकीचे आहे, असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल न्यायालयात जावे, असेही पाऊणकर म्हणाले.

Web Title: Irregularities in the work of the District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.