पोंभुर्णा परिसरात एक महिन्यापासून अनियमित वीज पुरवठा
By Admin | Updated: June 7, 2015 01:05 IST2015-06-07T01:05:02+5:302015-06-07T01:05:02+5:30
तालुक्यातील देवाडा खुर्द व इतर परिसरामध्ये वीज वितरण कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या बेताल कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

पोंभुर्णा परिसरात एक महिन्यापासून अनियमित वीज पुरवठा
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : तालुक्यातील वीज ग्राहक वैतागले, कार्यवाही करण्याची मागणी
पोंभूर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द व इतर परिसरामध्ये वीज वितरण कंपनीमधील कर्मचाऱ्यांच्या बेताल कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरातील गावांमध्ये रात्रीच्या सुमारास तब्बल एक महिन्यांपासून वीज पुरवठा खंडीत होत आहे. या प्रकाराची दखल घ्यायला संबंधीत विभागाचे अधिकारी तयार नसल्याने समस्या कायम आहे. त्यामुळे पोंभूर्णा परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.
पोंभूर्णा येथील महावितरण कंपनीच्या विद्युत वितरण केंद्रामार्फत परिसरामध्ये विद्युत पुरवठा केला जातो. याठिकाणी असलेल्या विद्युत वितरण उपकेंद्रामध्ये उपअभियंता म्हणून गावंडे नावाच्या महिला अधिकारी कार्यरत आहेत, तर त्यांच्या हाताखाली चहांदे नावाचे कनिष्ठ अभियंता व इतर अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांवर उपअभियंता गावंडे यांचे पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रण नसल्याने देवाडा (खुर्द) व इतर परिसरामध्ये तब्बल एक महिन्यापासून कधी अर्धा तास तर कधी एक तासानंतर सतत विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. आणि खंडीत झालेला वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी बराच अवधी लागतो. कधी-कधी तर यासाठी कित्येक तास खर्ची घालावे लागतात. त्यामुळे आधीच उष्णामान वाढून असल्याने प्रचंड उकाडा वाढला असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत स्थानिक नागरिकांना ताटकळत राहावे लागत आहे. परिणामी नागरिकांचे हाल होत आहेत. येथील कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने सर्वच बेताल कारभार याठिकाणी सुरू असुन नागरिक त्रस्त झाले आहेत.
पोंभूर्णा विद्युत वितरण कंपनीमधील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. कर्मचारी सुविधेच्या ठिकाणी राहुन ये-जा करतात. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात वीज पुरवठा करण्यासाठी ते असमर्थ ठरत आहेत. परिणामी स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सतत खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे घरगुती वीज उपकरणे प्रभावीत होत आहे.
अनियमीत वीज पुरवठा होण्यामागील कारणाचे स्पष्टीकरण एकही कर्मचारी देत नाही. मात्र महिन्याचे बील भरले नाही तर वीज विभागाचे कर्मचारी कुठलीही पुर्वसुचना न देता मनमर्जीने वीज पुरवठा खंडीत करतात. वीज वितरण कंपनीच्या या तुघलकी कारभारामुळे वीज ग्राहकांमध्ये कमालिचा संताप व्यक्त होत आहे.
परिसरातील विद्युत खांबाच्या तारा सुव्यवस्थीत नसुन याठिकाणचे रोहीत्र फार जुने झाले असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. त्यामुळे याठिकाणी नेहमी डीओ उडणे ही नित्याचीच बाब झाली आहे. परिणामी विद्युत दाबाचा प्रवाह कमी-जास्त होत असल्याने घरगुती इलेक्ट्रानिक्स वस्तुंवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या प्रकारामुळे घरगुती उपकरणे निकामी झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. विद्युत वितरण कंपनीच्या सततच्या होणाऱ्या या भोंगळ कारभारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असुन संबंधीत वीज पुरवठा नियमीत करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
देवाडा ग्रामपंचायतीचे ढसाळ नियोजन
गावामध्ये गेल्या एक महिन्यापासून सतत विद्युत पुरवठा खंडीत होत असुन त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे पाणी पुरवठासुद्धा अनियमीत होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असुन सदर समस्या सोडविण्यास ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित विभागाकडे साधा तक्रार अर्ज सुद्धा केलेला नाही. यावरून ग्रामपंचायत प्रशासन असमर्थ असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.
तक्रार अर्ज घेण्यास अधिकाऱ्यांचा नकार
देवाडा (खुर्द) येथील प्रतिष्ठित नागरिकांनी आपले वास्तव्य असलेल्या घरामध्ये थ्री-फेस मिटर घेतले असुन दोन महिन्यांपासून त्या ठिकाणी विद्युत दाबाचा प्रवाह फारच कमी असल्याने घरातील कुलर व पंखे पाहिजे त्या प्रमाणात काम करीत नससल्याचे पोंभूर्णा येथील विद्युत वितरण उपकेंद्रातील अधिकाऱ्यांना वारंवार दूरध्वनीवरून व स्वत: भेटूनसुद्धा सांगीतले. परंतु तेथील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मीटरवर होणारा अल्प पुरवठा दुरूस्त करून दिलेला नाही.
वित्तमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज
पोंभूर्णा तालुका क्षेत्र हा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभा क्षेत्र आहे. याच आदिवासीबहुल क्षेत्रातून ना.मुनगंटीवार तिनदा निवडून आलेत. आज ते मंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. केंद्रात व राज्यात त्यांचेच बहुमताचे सरकारसुद्धा आहे. त्यामुळे आपल्या क्षेत्रातील स्थानिक गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लक्ष घालावे व अकार्यक्षम कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करून स्थानिकांना न्याय मिळवून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
शेती व्यवसायावर परिणाम
पोंभूर्णा परिसरातील शेतकरी अपुऱ्या सिंचन व्यवस्थेमुळे अगोदरच डबघाईस आलेला आहे. आणि सततच्या नापीकीमुळे कर्जाच्या घाईत सापडला आहे. त्यातच शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेतीमध्ये भाजीपाला पिकाचे उत्पादन घेऊन आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या प्रयत्नात असतानाच विद्युत वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे भाजीपाला उत्पादनाला पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नसल्याने पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होत नाही.