इरई पुन्हा झाली प्रदूषित

By Admin | Updated: August 18, 2016 00:31 IST2016-08-18T00:31:00+5:302016-08-18T00:31:00+5:30

संपूर्ण देशभर सरकार नदी स्वच्छता अभियान राबवित आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार इरई नदीच्या ...

Irai was again polluted | इरई पुन्हा झाली प्रदूषित

इरई पुन्हा झाली प्रदूषित

चंद्रपूर : संपूर्ण देशभर सरकार नदी स्वच्छता अभियान राबवित आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार इरई नदीच्या स्च्छतेसाठी जलपुरूष राजेंद्र सिंग यांना चंद्रपुरात आणत आहेत, चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया नदी स्वच्छतेसाठी जनजागृती करीत पुरस्कार देत आहेत. असे असतानाही चंद्रपूरची इरई नदी मात्र प्रदूषितच होत आहे. गेल्या २४ तासांपासून या नदीतून अचानकपणे लाल-कथ्थ्या रंगाच्या पाण्याचा प्रवाह वाहायला लागल्याने ही समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे.
बुधवारी सकाळी या नदीतून लालसर रंगाचा प्रवाह येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तुकूम परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रातील हौदात मोठ्या प्रमाणावर लाल रंगाचे पाणी जमा झाले. त्यामुळे हा काय प्रकार आहे, हे कुणालाही कळेना. चंद्रपुरातील पर्यावरणवाद्यांना हा प्रकार माहीत होताच त्यांनी नदीकडे धाव घेतली. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी अधिक शोध घेतला असता, कुंदन प्लाझा हॉटेलजवळून वाहणाऱ्या नाल्यातून हे लाल रंगाचे पाणी येवून इरई नदीच्या प्रवाहात मिसळत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, सचिन वझलवार, इको-प्रो संघटनेचे बंडू धोतरे आणि त्यांचे कार्यकर्ते व नागरिक या प्रवाहाच्या उगम स्त्रोताच्या शोधार्थ निघाले असता, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून येणाऱ्या नाल्यातून हे पाणी येत असल्याचे लक्षात आले.
हा प्रकार उघड होताच प्रा. चोपणे आणि ग्रीन प्लॅनेटच्या कार्यकर्ऱ्यांनी सीटीपीएसच्या अधिकाऱ्यांना नाल्याकडे बोलावले. याच वेळी पोलीसही तिथे पोहचले. प्रदुषण नियंत्रक मंडळाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर या सर्वांकडे त्यांनी तक्रारी केल्या. सुरूवातीला हे पाणी आपल्या परिसरातून येतच नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र खरी परिस्थिती लक्षात आणून दिल्यावर आणि पोलिसात तक्रार करण्याची भूमिका घेतल्यावर हे अधिकारी वरमले.
दरम्यान, या ग्रीन प्लॅनेटसोसायटीने दुर्गापूर पोलीस स्टेशन आणि रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या पाण्याचे नमुने त्यांनी घेतले असून प्रशासनाला आणि पोलिसांना सादर केले आहेत. सीटीपीएसच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या सर्व पर्यावरणप्रेमींनी केली आहे. इरईमध्ये प्रदुषित पाणी सोडण्याची ही सीटीपीएसची पहिलीच वेळ नव्हे. या नदीच्या पात्रात सोडलेल्या राखेमुळे निर्माण झालेले राखेचे खडक गेल्या चार महिन्यांपूर्वीच नदी शुद्धीकरणाच्या कामात आढळले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूरचे जलशुद्धीकरण केंद्र ठप्प
चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणारे तुकूम परिसरातील एकमेव जलशुद्धीकरण केंद्राचे काम ठप्प पडले आहे. मोठ्या प्रमाणावर हे रासायनिक पाणी केंद्राच्या टाक्यांमध्ये जमा झाल्याने ते शुद्ध कसे करायचे, असा प्रश्न आहे. हे पाणी तसेच वितरित केले गेले तर नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भीतीे आहे. या प्रकरणी केंद्राचे संचालक योगेश समरित यांनी महानगर पालिकेच्या आयुक्तांकडे आणि महापौरांकडे तक्रार दाखल केली आहे.

सीटीपीएसची मुजोरी कायम
हा प्रकार लक्षात येवूनही सीटीपीएसची मुजोरी मात्र कायमच होती. ‘लोकमत’ने या संदर्भात प्रतिक्रिया घेतली असता, हा नाला शक्तीनगरमधून येत असल्याने हे पाणी आपल्या परिसरातून आलेले नाही, असे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले. महाऔष्णिक वीज केंद्राच्या रिजेक्ट होलमधून पाणी झिरपते. त्यामुळे पाण्यचा रंग बदलतो. अन्य दिवसात फ्लो दिसत नाही. मात्र असे प्रदुषित पाणी आपल्याकडून सोडले जात नाही. शुद्ध करूनच पाणी सोडले जाते, असे सांगण्यात आले.
प्रदुषण नियंत्रक मंडळाचे अधिकारी बेदखल
हा प्रकार घडूनही प्रदुषण नियंत्रक मंडळाचे अधिकारी बेदखलच होते. पतेतीच्या सणाची सुटी असल्याने कुणीच अधिकारी जागेवर नव्हते. त्यामुळे या विभागाच्या वतीने कुणीही फिरकले नाही.
गुन्हे नोंदवा- पालकमंत्र्यांचे आदेश
हा प्रकार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कानावर घातला असता, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

कसे येते हे पाणी ?
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने कोळश्याचे प्रचंड साठे आपल्या परिसरात उभारून ठेवले आहेत. पावसाचे पाणी या साठ्यातून झिरपत आणि साचत अ‍ॅश टँकपर्यंत पोहचते. पावसाचे पाणी दगडी कोळश्याच्या संपर्कात आल्यामुळे कोळश्यातील सल्फर, नायट्रेट, जड धातू या पाण्यात मिसळते. त्यामुळे पाण्याचा रंग बदलून ते लालसर रंगाचे व आम्लयुक्त होते. हे पाणी मनुष्य आणि जलचर प्राण्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. हे सर्व कोळश्याच्या परिसरातील अ‍ॅसिड माईन्स ड्रेनेजमुळे घडते. अशा पाण्याचा पीएच (सामू) बरेचदा तीनपर्यंत घसरतो. उन्हाळ्यात तर शून्यपर्यंत उतरतो. त्यामुळे जलचर प्राणी मरतात. यापूर्वी बरेचदा असे प्रकार घडले आहेत.

Web Title: Irai was again polluted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.