दारू तस्करीत अल्पवयीन मुलांचा सहभाग
By Admin | Updated: February 21, 2017 00:32 IST2017-02-21T00:32:28+5:302017-02-21T00:32:28+5:30
जिल्ह्यात दारूबंदी झाली आणि काहींच्या हाताला नवा रोजगार गवसला आहे.

दारू तस्करीत अल्पवयीन मुलांचा सहभाग
धाबा पोलिसांची कारवाई : बारावीच्या विद्यार्थ्याला अटक
धाबा : जिल्ह्यात दारूबंदी झाली आणि काहींच्या हाताला नवा रोजगार गवसला आहे. प्रतिष्ठा बाजूला ठेवून काही प्रतिष्ठितही या व्यवसायात उतरले आहेत. मोठा नफा, नगदी पैसा मिळत असल्याने आता अल्पवयीन मुलेही या व्यवसायात उडी घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवैधरीत्या दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना धाबा पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, यातील एक आरोपी इयत्ता बारावीचा विद्यार्थी आहे.
चंद्रपूर जिल्हा दारूबंदी घोषित झाला. त्यानंतर तळीरामाची तहान भागविण्यासाठी अनेक हात पुढे येऊ लागले आहेत. दारूबंदीला अवैध दारूविक्रीचे मोठे ग्रहण लागले आहे. मोठा नफा अन् नगदी पैसा असल्याने या व्यवसायात येणाऱ्यांची गर्दी दिवसागणिक वाढत आहे. चक्क पोलीस ठाण्यातून दारूविक्री होत असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराने जिल्हा हादरला.
आता चक्क विद्यार्थीही दारूविक्री व्यवसायात उतरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धाबा उपपोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथे शनिवारी पोलिसांनी अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. परंतु एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे यांनी दिली.
नंदी मल्लाजी चंद्रगिरीवार रा. मुलचेरा, राजकुमार रमेश मोहुर्ले रा. घडोली, मिराबाई तुळशिराम कासेवार अशी आरोपींची नावे आहेत तर संतोष तुळशिराम कासेवार हा फरार आहे. आरोपीकडून सात हजार रुपये किमतीची दारु, दोन दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये एक बारावीचा विद्यार्थी आहे.
पोलीस जवान गस्तीवर असताना डोंगरगावजवळ ही कारवाई करण्यात आली. युवराज खेवले, बाबा नैताम, अरविंद राठोड, नरेश नन्नावरे, श्यामा पाल या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकानी ही कारवाई केली. दरम्यान, जप्त करण्यात आलेला दारुसाठा तेलंगणामार्गे जिल्ह्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
तेलंगणातून तस्करी
धाबा परिसराची सीमा तेलंगणाला लागून आहे. त्यामुळे तेलंगणातून दारू तस्करी होत असल्याची माहिती आहे. अवैध दारूविक्री करणाऱ्यांसाठी धाबा उपपोलीस स्टेशनअंतर्गत येणारी गावे डेंजर झोन ठरली आहेत. दारूबंदी झाल्यापासून धाबा पोलीस सतत कारवाई करीत आहेत. काही मोठ्या कारवाया या पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आल्या आहेत.