वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरणासाठी पुगलियांचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

By Admin | Updated: September 1, 2015 00:43 IST2015-09-01T00:43:48+5:302015-09-01T00:43:48+5:30

चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालच्या पहिल्या सत्राला १ सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे

Invitation of Puglia Chief Minister for the nomination of medical college | वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरणासाठी पुगलियांचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरणासाठी पुगलियांचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

नामकरणाला मान्यता द्या : फुले-आंबेडकर आणि कन्नमवार यांच्या नावासाठी पत्र
चंद्रपूर : चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालच्या पहिल्या सत्राला १ सप्टेंबरपासून शुभारंभ होत आहे. या महाविद्यालयासाठी ‘फुले-आंबेडकर’ चंद्रपूर जिल्हा मजदूर काँग्रेसने जाहीर केले असून नामकरण आणि महाविद्यालयाच्या प्रारंभाचा आनंदोत्सव चंद्रपुरात आयोजित केला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजर राहावे आणि या नामकरणाला मान्यता द्यावी, अशी विनंती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी मुख्यमंत्र्यांना एका पत्रातून केली आहे.
चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘फुले-आंबेडकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ या नावासोबतच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘कर्मवीर कन्नमवार’ यांचेही नाव त्यांनी जाहीर केले आहे. तत्कालिन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते या महाविद्यालयाच्या ईमारतीचे भूमिपूजन झाले होते. त्यांनी भरीव निधीही दिला होता. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री असलेले मा.सा. कन्नमवार यांचे मूल-सावली हे निर्वाचन क्षेत्र होते. त्या भागातील जनतेने या नावाची शिफारस केल्याने लोकभावनेचा आदर करून या दोन्ही नावांना मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयाच्या १ सप्टेंबरपासून होणाऱ्या प्रारंभाचे औचित्य साधून स्थानिक गांधी चौकात नागरिकांकडून नामकरणानिमीत्त आणि महाविद्यालयाच्या स्थापनेचा आनंदोत्सव म्हणून ५६ प्रकारच्या मिठाईच्या वाटपाचा आणि कव्वालीचा कार्यक्रमही ठेवण्यात आला आहे. यासाठी त्यांनी एका पत्रातून निमंत्रण दिले आहे.
वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या दोन्ही वास्तुसाठी आलेली नावे जनतेकडून आहेत. दिवंगत मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्याशी या जिल्ह्यातील जनतेचे नाते आणि भावना जुळलेल्या आहेत. त्यातूनच हे नाव पुढे आले. लोक चर्चेतून ही नावे आल्याने ती अव्हेरणे हा लोक भावनेचा अनादर ठरु शकतो. त्यामुळे या नावाला सरकारकडून मान्यता मिळेल, अशी अपेक्षा पुगलिया यांनी व्यक्त केली आहे.यातूनच या नामकरणाची त्यांनी घोषणा केली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

नागरिकांनी सहभागी व्हावे - नरेश पुगलिया
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘फुले-आंबेडकर’ असे होणारे नामकरण आणि महाविद्यालय स्थापनेनिमीत्त आयोजित केलेला आनंद सोहळा या दोन्ही कार्यक्रमासाठी जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेतून केले. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल पुगलिया, चंद्रपूर जिल्हा मजदूर काँग्रेसचे महासचिव साईनाथ बुचे, काँग्रेस महानगर अध्यक्ष गावंडे गुरूजी, अ‍ॅड. अविनाश ठावरी, माजी नगराध्यक्ष डॉ. महाकुलकर, नगरसीवक प्रविण पडवेकर, अशोक नागापुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पुगलिया म्हणाले, हा नागरिकांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस असल्याने शहरातील सामाजिक संस्थांच्या वतीने या आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमीत्त गांधी चौकात सायंकाळी ५ वाजेपासून सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या पहिल्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचा आणि जनहीत याचिकेच्या माध्यमातून चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय मिळवून देणाऱ्या नागरिकांचा सत्कार केला जाणार आहे. ५६ प्रकारच्या मिठार्इंचे स्टॅल लावले जाणार असून या ५६ भोग मिठाई व नमकीनचे स्टॉल सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत नागरिकांसाठी सुरू राहणार आहेत. या सोबतच, सायंकाळी मुंबईचे छोटा मजिद शोला आणि बनारसच्या रेहाना बेग यांच्या कव्वालीचा दुय्यम मुकाबलाही ठेवण्यात आला आहे. वेळेवर पाऊस आल्यास हा कार्यक्रम राजीव गांधी कामगार भवन येथे आणि ५६ भोग मिठाई-नमकीन वाटपाचा कार्यक्रम न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये होईल. नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Invitation of Puglia Chief Minister for the nomination of medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.