विद्यार्थ्यांनी दिले शिक्षणमंत्र्यांना भेटीचे निमंत्रण

By Admin | Updated: June 28, 2016 01:03 IST2016-06-28T01:03:53+5:302016-06-28T01:03:53+5:30

सोमवारपासून जिल्ह्यातील शाळांची पहिली घंटा वाजली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे

Invitation to meet the students | विद्यार्थ्यांनी दिले शिक्षणमंत्र्यांना भेटीचे निमंत्रण

विद्यार्थ्यांनी दिले शिक्षणमंत्र्यांना भेटीचे निमंत्रण

चंद्रपूर : सोमवारपासून जिल्ह्यातील शाळांची पहिली घंटा वाजली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील तीन शाळांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न केले तर विद्यार्थ्यांनीही त्यांना ‘तुम्ही आम्हाला भेटायला येणार काय’, असा प्रश्न करून भेटायला येण्याची गळ घातली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलेल्या या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये १७ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
शाळेच्या पहिला दिवशी सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. त्यामुळे सोमवारी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव आनंदात साजरा करण्यात आला. दरम्यान, डिजीटल शाळा, ज्ञानरचनावाद आदींबाबत उत्तम कामगिरी करणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांशी शिक्षणमंत्री विनोद तावडे थेट संवाद साधणार होते. यासाठी विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, नागपूर, बुलढाणा या चार जिल्ह्यातील प्रत्येकी एका शाळेतील विद्यार्थ्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील दाताळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. मात्र शिक्षण विभागाने शिक्षणमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी कोसारा व घुग्घुस येथील दोन जिल्हा परिषद शाळेच्या १० विद्यार्थ्यांचाही समावेश केला. त्यात तिन्ही जिल्हा परिषद शाळांचे १७ विद्यार्थी व्हिडीओ कॉन्फरन्सला उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हिडीओ कॉन्फरन्स हॉलमध्ये सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधणे सुरू केले. त्यांच्यासोबत प्रधान सचिव नंदकुमार, संचालक गोविंद नांदेडे उपस्थित होते. शिक्षणमंत्र्यानी व्हिडीओ कॉन्फरन्सला उपस्थित पालकांशीही संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. कॉन्फरंन्सनंतर हे सर्व विद्याथी बरेच उत्साही दिसले. शिक्षणमंत्र्यांशी काय चर्चा केली हे जाणून घेण्यासाठी अन्य विद्यार्थीही आतूर होते. (स्थानिक प्रतिनिधी)

या विद्यार्थ्यांचा होता सहभाग
४दाताळा शाळेतील ऋतुजा देशकर, सीमरन देशकर, करिना हिवरकर, नेहा सिडाम, भाग्यश्री ननावरे, जयेश झाडे, लक्ष्मण मेहर या विद्यार्थ्यांसह घुग्घुस व कोसारा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रत्येकी ५ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी शिक्षण सभापती देवराव भोंगळे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) निलेश पाटील, शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर, उपशिक्षणाधिकारी धनपाल फटींग, केंद्रप्रमुख रत्नमाला खोब्रागडे, विजय भोयर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत सोमलकर, मुख्याधापक गुरुदेव पार्लेवार, पालक सुमनताई देशकर, कल्पना झाडे, शिक्षक विवेक इतड़वार, प्रफुल आंबटकर यांची उपस्थिती होती.

शिक्षणमंत्री व विद्यार्थ्यांमध्ये झालेला संवाद
४शिक्षणमंत्री : शाळेत सर्व विद्यार्थी आलेत का?
४विद्यार्थी : होय सर, आम्ही प्रभात फेरी काढून मुलांना शाळेत येण्याचे आवाहन केले.
४शिक्षणमंत्री : शाळेत पहिल्या दिवशी जाऊन तुम्ही काय केले?
४विद्यार्थी : शाळा स्वच्छ करून घेतली, नवीन गणवेश, पुस्तके मिळाली. ती व्यवस्थित ठेवली.
४शिक्षणमंत्री : शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय आहे का?
४विद्यार्थी : होय सर, शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय आहे. आम्ही घरून पाण्याची बॉटल आणत नाही. कारण, आमच्या शाळेत वॉटर फिल्टरचे पाणी आहे.
४शिक्षणमंत्री : वाचन प्रेरणा दिवस कसा साजरा केला?
४विद्यार्थी : आम्हाला आवडणाऱ्या पुस्तकांचे वाचन केले. वासवी क्लबने आम्हाला ५ हजार रुपयांची पुस्तके दिलीत. डॉ.अब्दुल कलाम वाचनकट्टा प्रत्येक वर्गात तयार केला आहे.
४शिक्षणमंत्री : मुलांमुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह आहे का?
४विद्यार्थी : होय सर, आमच्या शाळेत मुलामुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह आहेत. आम्ही ते नेहमीच स्वच्छ ठेवतो.
४शिक्षणमंत्री : १ जुलैला किती झाडे लावणार?
४विद्यार्थी : आम्ही ३०० झाडे लावू व सर्व झाडे जगवू.

शिक्षणमंत्री घेणार विद्यार्थ्यांची भेट
४दाताळा जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी भाग्यश्री नन्हावरे हिने थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना प्रश्न केला. सर, तुम्ही आम्हाला भेटायला येणार का? यावर ना. तावडे यांनी हसत होकार देत, नक्की भेटायला येण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Invitation to meet the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.