‘त्या’ आत्महत्या प्रकरणाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात
By Admin | Updated: March 16, 2015 00:41 IST2015-03-16T00:41:39+5:302015-03-16T00:41:39+5:30
येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कामाला असलेल्या तरुणीचा, तिचा प्रियकर आणि एका मित्राचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला.

‘त्या’ आत्महत्या प्रकरणाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात
बल्लारपूर : येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कामाला असलेल्या तरुणीचा, तिचा प्रियकर आणि एका मित्राचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला. सदर प्रकरण त्रिकोणी प्रेमातून घडल्याची शहरात चर्चा आहे. या घटनेला आठवड्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही या प्रकरणातील मुख्य आरोपीपर्यंत पोलीस पोहोचलेच नसल्याने नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावल्या जात आहे. दरम्यान, मृत तरुणांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणातील दोषींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे येथील आत्महत्या प्रकरण सध्यातरी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
सोमवार ९ मार्च रोजी वर्धा नदीच्या राजुरा पुलाजवळ रोजा लखपती बानोत (२२), नीलेश पवार (२५), अमोल अंड्रस्कर (२६) या तिघांचा मृत्यू झाला.
रोजा मागील आठ महिन्यापासून येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कामाला होती. येथील कामावरून तिच्या प्रियकरासोबत नेहमी खटके उडत होते. यावरून निलेशचा संशय वाढत गेला. अशातच नीलेशचे डॉक्टरसोबत भांडण झाले. याबाबत दोघेही पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले.
यावेळी जर पोलिसांनी समझोता करण्यापेक्षा तक्रार नोंदविली असती तर, किमान तिघांचा जीव वाचला असता, असे नागरिकांमध्ये आता बोलल्या जात आहे. एवढेच नाही तर, पोलिसांच्या तपासावरही नागरिकांनी तर्कवितर्क लावणे सुरु केले आहे. ज्या दिवशी डॉक्टरसोबत निलेशचे भांडण झाले. त्या दिवसापासून रोजा व्यथीत झाली होती. तिने निलेशला समजविण्याचा प्रयत्नही केला. एवढेच नाही तर तिने डॉक्टरची माफी मागण्याची गळ घातली. मात्र चूक नसल्याने आपण माफी मागायची तरी कशाला, अशी भूमिका निलेशची होती.
दोघांचेही भांडण टोकाला गेल्यानंतर अमोल अंड्रस्करला बोलावण्यात आले. कारण नसतानाही केवळ मित्राच्या आग्राखातर अमोल वर्धानदीवर पोहचला आणि त्या दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचाही जीव गेला. पोलिसांनी या प्रकरणातील मूळ सुत्रधाराचा शोध लावून कारवाई करावी, अशी मागणी आता मृतकाच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी केली आहे.
(शहर प्रतिनिधी)