अधीक्षकांच्या धाकाने वाहनांचे अतिक्रमण हटले
By Admin | Updated: March 15, 2015 01:03 IST2015-03-15T01:03:57+5:302015-03-15T01:03:57+5:30
गडचांदूर पोलीस ठाण्याची पोलीस अधिक्षकांनी ११ मार्च रोजी तपासणी केली. ते येणार असल्याची माहिती मिळताच अख्खे पोलीस ठाणे कामाला लागले.

अधीक्षकांच्या धाकाने वाहनांचे अतिक्रमण हटले
गडचांदूर: गडचांदूर पोलीस ठाण्याची पोलीस अधिक्षकांनी ११ मार्च रोजी तपासणी केली. ते येणार असल्याची माहिती मिळताच अख्खे पोलीस ठाणे कामाला लागले. कधी खुले न दिसणारे रस्ते पूर्णपणे खुले दिसले. रस्त्यावरील वाहनांचे अतिक्रमण मोकळे झाले. मात्र साहेब गेल्यानंतर परिस्थिती जैसे थे झाली. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांंनी येथे नियमित भेट द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
माणिकगड कंपनीकडे जाणाऱ्या या रस्त्यावर नेहमी रस्त्याच्या दुतर्फा ट्रक उभे राहतात. रस्त्यावर अतिक्रमण व वाहनांचा धूर आणि रस्त्यावरची धुळ यामुळे दुचाकी चालक हैराण झाले आहे. मात्र पोलीस अधिक्षकांच्या दौऱ्यामुळे या रस्त्यावर वाहन हटविण्यात आले.
नागरिकांच्या डोळ्यात धुळीचे कण जाऊ नये म्हणून विशिष्ट प्रसंगी माणिकगड कंपनी टँकरच्या माध्यमातून पाणी टाकतात. या दौऱ्यामुळे कंपनीनेही रस्त्यावर पाणी टाकले. मात्र ते गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र रस्त्यावर पाणी शिंपडण्याचे सौजन्य दाखविले नाही.
पोलिसांकडून नेहमी गडचांदूरवासीयांची उपेक्षा होत आहे. जे काम पोलीस अधिक्षक येणार म्हणून झाले तेच काम दररोज केले तर नागरिकांनाही सुरक्षित वाटेल. वर्दळीच्या वेळी याठिकाणी वाहतूक पोलीस देणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)