पावसाअभावी पिकांची रोवणी खोळंबली

By Admin | Updated: August 29, 2015 01:19 IST2015-08-29T01:19:38+5:302015-08-29T01:19:38+5:30

स्थानिक पिंपळगाव जिल्हा परिषद क्षेत्र हा धान व भाजीपाला पिकासाठी प्रसिद्ध आहे.

Intersection of crops due to lack of rain | पावसाअभावी पिकांची रोवणी खोळंबली

पावसाअभावी पिकांची रोवणी खोळंबली

सिंचनाचीही सुविधा नाही : रोवणीनंतरही हवे पाणी
पिंपळगाव : स्थानिक पिंपळगाव जिल्हा परिषद क्षेत्र हा धान व भाजीपाला पिकासाठी प्रसिद्ध आहे. धानाची रोवणी करण्यासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. परंतु मागील कित्येक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कित्येकांची रोवणी खोळंबली आहे. बहुतांश रोवणी झालेल्या शेतात भेगा पडून धान पिकाला सुवाऱ्या वळल्याने आता धानाचे पिक पाण्याअभावी करपणार म्हणून पिंपळगाव जि.प. क्षेत्रातील शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे.
जून महिन्यात पिंपळगाव परिसरात संततधार पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी धानपऱ्हे शेतात टाकणे सुरु केले. त्यामुळे यावर्षी तरी पाऊस भरपूर येणार व आम्ही सुखी होणार या आशेवर शेतकरी आनंदात दिसत होता. मात्र पऱ्हे टाकून झाल्यावर तुरळक पाऊस आला. पऱ्हे चांगले अंकुरले. आज ना उद्या पाऊस येईल म्हणून शेतकरी बेरीज-वजाबाकी करीत राहिला. पाऊस आला पण पाहिजे तेवढा दमदार स्वरुपात आला नाही. तरीही जेवढे आहे, त्याच्यातच जसे होईल तसे धानाच्या पऱ्ह्यांची रोवणी केली.
या परिसरात कोणतेच पाणी साठविण्याचे साधन नाही. मात्र विहिरी भरपूर असून त्याही अखेरच्या घटका मोजत आहेत. विहिरीची पाण्याची पातळी प्रचंड खोल गेली आहे. जमिनीच्या २०० ते ३०० फूटाच्या खालीही पाण्याचा पत्ता नसल्याने विहीरी व पंपाच्या भरवशावर धानाची रोवणी करणारे आता निसर्गावर अवलंबून असून आज ना उद्या तरी पाऊस येईल व आपल्या शेतातील भरपूर उत्पादन येईल या आशेवर आहे. धान उत्पादक शेतकरी मिळेल त्या मार्गाने पैसे काढून एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च करीत आहे. आपल्याला मेहनतीचे फळ आज ना उद्या मिळेल म्हणून अंक गणित जोडत असून पूर्ण वर्षाचा आराखडा आखून तो पावसाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु निसर्ग मात्र कोणत्या न कोणत्या रुपाने शेतकऱ्यावर कोपतानाच दिसत आहे.
अद्यापही पिंपळगाव परिसरात पावसाअभावी धानाच्या पऱ्ह्याची रोवणीची कामे खोळंबली आहेत. धानाचे पिक कसे येणार, ही चिंता आहेच. येत्या काही दिवसात पावसाच्या जोरदार सरीची आवश्यकता असून रोवणी झाल्यावरही पिकाला पाणी भरपूर लागणार आहे. असे झाले नाही तर शेतकऱ्याचे हाल होण्याचे भयावह चित्र आताच दिसू लागले आहे. उन्हाळी धान पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले. दु:खाचे अश्रु सुकण्याअगोदर पुन्हो डोळ्यात अश्रु येण्याचे वेळ आली आहे. परिसरातील धान उत्पादक पाणावलेल्या डोळ्यांनी आभाळाकडे पाहत आहे. (वार्ताहर)

Web Title: Intersection of crops due to lack of rain