आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपट महोत्सवासाठी चंद्रपुरात जय्यत तयारी
By Admin | Updated: February 19, 2017 00:37 IST2017-02-19T00:37:02+5:302017-02-19T00:37:02+5:30
येत्या २४ फेब्रुवारीपासून चंद्रपुरात प्रारंभ होत असलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय माहितीचित्रपट महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय माहिती चित्रपट महोत्सवासाठी चंद्रपुरात जय्यत तयारी
विविध विषयांवर मंथन होणार : चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज चंद्रपुरात येणार
चंद्रपूर : येत्या २४ फेब्रुवारीपासून चंद्रपुरात प्रारंभ होत असलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय माहितीचित्रपट महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारे संकलित या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आयोजकांकडे प्राप्त झाली आहे. मानवी मुल्यांची विविध अंतरंगे उकलून समाज जीवनातील अनेक घृणास्पद परंपरांवर प्रहार करून अंर्तबोध जागविणारी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त दर्जेदार तारांकित माहिती चित्रपटांची प्रदर्शने हे या महोत्सवाचे वैशिष्ठे ठरणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात जगभरातील उत्कृष्ट अशा ३३ माहिती चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जेदार ‘आस्कर’ पुरस्कारांनी सन्मानित अनेक माहिती चित्रपटांचा या सुचित समावेश करण्यात आला आहे. दादासाहेब फाळकेद्वारा निर्देशित प्रथम भारतीय बोल चित्रपट राजा हरिश्चंद्रपासून आजतागायतच्या संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीची स्थित्यंतरे प्रदर्शित करणाऱ्या माहितीपटांद्वारे या प्रदर्शनीची सांगता होईल.
चंद्रपूर आणि परिसरातील चित्रीकरण क्षेत्रात संधी शोधणाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण या महोत्सवादरम्यान दिले जाणार असून या महोत्सवात त्यांच्यासाठी विशेष सत्र चालणार आहे. आंतरराष्ट्रीय माहितीचित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूरचा प्राचीन इतिहास, निसर्ग व वन्यजीवनाशी नाते जगणारे तसेच चंद्रपूरच्या सांस्कृतिक सामाजिक वारस्याची जतन करणारी व्यक्तीमत्त्वे यांची दखल घेण्यासाठी ही संधी उपलब्ध झालेली आहे. मनिष देसाई निर्देशक चित्रपट विभाग तथा शांतराम पोटदुखे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री या महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदाची धुरा सांभाळीत आहेत. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते होणार असून ना. सुधीर मुनगंटीवार हे या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी असतील.
याप्रसंगी सचिव माहिती व प्रसारण मंत्रालय अजय मित्तल, माजी न्यायाधीश विकास सिरपुरकर, आॅस्कर विजेते चित्रपट निर्माते माईक पांडे, चित्रपट निर्माते निर्देशक किरण शांताराम, सैराट फेम नागराज मंजुळे अशा अनेक दिग्गजांची उपस्थिती या महोत्सवात राहणार आहे. महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)