आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाचे नियोजन सुरू
By Admin | Updated: November 10, 2015 01:31 IST2015-11-10T01:31:54+5:302015-11-10T01:31:54+5:30
‘पुनरूत्थानाकरिता संशोधन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाचे नियोजन सुरू
गोंडवाना विद्यापीठात चर्चासत्र : ११ ते १३ फेबु्रवारी २०१६ दरम्यान परिषद
गडचिरोली : ‘पुनरूत्थानाकरिता संशोधन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान करण्यात येणार आहे. या परिषदेच्या आयोजनासाठी विद्यापीठ कामाला लागले असून शनिवारी कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली.
भारतीय शिक्षण मंडळ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती व व्ही. एन. आय. टी. नागपूर येथे ११, १२ व १३ फेब्रुवारी २०१६ रोजी ‘पुनरूत्थानाकरिता संशोधन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यामागे नेमके कोणते कारण आहे. त्याचे महत्त्व व सदर परिषद चांगल्या पद्धतीने पार पडावी यासाठी पूर्वतयारी कशी करावी, याबाबतच्या चर्चासत्राचे आयोजन शनिवारी करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय शिक्षण मंडळाचे मुकूल कानेटकर, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद जोशी, आयोजन सहसचिव डॉ. लीना गहाणे, सचिव राजेंद्र पाठक आदी उपस्थित होते.
संशोधन कशासाठी, कुणासाठी, संशोधनाचा दृष्टीकोन, उद्दिष्ट्ये व पद्धती, संशोधनाचा समाज जीवनाकरिता उपयोग आदी मुद्यांना धरून चर्चासत्रामध्ये अभ्यासक, संशोधक, प्राचार्य व विविध प्राधिकरणाचे सदस्य यांच्यासोबत चर्चा झाली व मार्गदर्शन करण्यात आले.
याच चर्चासत्राला १०० पेक्षा अधिक अभ्यासक, संशोधक, प्राचार्य, विविध प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते. संचालन बीसीयूडीचे संचालक डॉ. श्रीराम रोकडे तर आभार विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)