खोट्या दस्तऐवजाद्वारे भूखंडाची परस्पर विक्री
By Admin | Updated: April 30, 2017 00:34 IST2017-04-30T00:34:44+5:302017-04-30T00:34:44+5:30
तळोधी (बा) टिचर कॉलनी, भडके लेआऊटमधील प्लॉट क्रमांक ११ व प्लॉट क्रमांक १३ या प्लॉटचे खोटे दस्तऐवज तयार करून परस्पर विक्री करण्यात आली.

खोट्या दस्तऐवजाद्वारे भूखंडाची परस्पर विक्री
महिलेसह दोन आरोपी : तळोधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तळोधी (बा) : तळोधी (बा) टिचर कॉलनी, भडके लेआऊटमधील प्लॉट क्रमांक ११ व प्लॉट क्रमांक १३ या प्लॉटचे खोटे दस्तऐवज तयार करून परस्पर विक्री करण्यात आली. या प्रकरणी एक अज्ञात स्त्री व नागपूर येथील दिनेश शामराव मोहोगावकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून तळोधी (बा) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
१० वर्षांपूर्वी फिर्यादी वनिता शांताराम संतोषवार यांनी तळोधी (बा) येथील टीचर कॉलनीमध्ये प्लॉट क्रमांक ११ हा १७६ चौरस मीटर व प्लॉट क्रमांक १३ हा १६२.३७ चौरस मीटर खरेदी केले होते. त्यांनी या प्लॉटचे फेरफार घेऊन तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात नोंद केली होती. मात्र अज्ञात स्त्रीने व नागपूर येथील दिनेश मोहोगावकर याने वनिता संतोषवार यांचे खोटे दस्ताऐवज व आधारकार्ड तयार केले. संतोषवार यांना दुर्धर आजाराचा त्रास असल्यामुळे त्यांना पैशाची आवश्यकता असल्याचे आरोपींनी बनाव तयार केला.
त्याद्वारे तळोधी (बा) येथील नयनकुमार शिवणकर यांना टीचर कॉलनीमधील प्लॉट क्रमांक ११ व प्लॉट क्रमांक १३ चे खोटे दस्तऐवज तयार करून आरोपीकडून दुय्यम निबंधक कार्यालयात विक्रीची नोंद करण्यात आली. शिवणकर यांनी दोन्ही प्लॉटचा फेरफार घेऊन तलाठी कार्यालयात नोंद केली. परंतु फिर्यादी वनिता संतोषवार आपल्या प्लॉटचा मालमत्ता कर भरणाकरिता तलाठी कार्यालयात गेल्या असता दोन्ही प्लॉटची परस्पर विक्री करण्यात आल्याचे त्यांना आढळून आले. त्या आशयाची तक्रार त्यांनी तळोधी (बा.) पोलीस ठाण्यामध्ये केली आहे. याप्रकरणी तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत पांढरे यांनी तपास करून अपराध क्रमांक ९२१/२०१७ नुसार आरोपी अज्ञात स्त्री व नागपूर येथील दिनेश शामराव मोहोगावकर याच्याविरूद्ध भादंवि कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास ठाणेदार श्रीकांत पांढरे व पीएसआय जितेंद्र ठाकूर करीत आहेत. (वार्ताहर)