उन्हाच्या तीव्रतेने जिवती परिसरातील पिके करपली
By Admin | Updated: September 29, 2014 00:42 IST2014-09-29T00:42:31+5:302014-09-29T00:42:31+5:30
माणिकगढ पहाडावरील जिवती तालुक्यात २० हजार ५१७ चौरस हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून त्यात मुख्यत: कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद असे पिके घेतली जाते. निसर्गाच्या पावसाने

उन्हाच्या तीव्रतेने जिवती परिसरातील पिके करपली
जिवती : माणिकगढ पहाडावरील जिवती तालुक्यात २० हजार ५१७ चौरस हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून त्यात मुख्यत: कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद असे पिके घेतली जाते. निसर्गाच्या पावसाने दिलेली हुलकावणी आणि कडक उन्हाच्या तडाख्यामुळे शेतातील उभी पिके करपत असून यावर्षीही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिवती तालुका हा तसा डोंगराळ व खरीप हंगामाचा तालुका म्हणून ओळखला जातो. सिंचन क्षेत्रही तालुक्यात अगदी बोटावर मोजण्याइतके आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे भवितव्य सर्वस्वी खरिपाच्या पेरणीवर अवलंबून आहे. सुरुवातीच्या मध्यम हलक्या पावसाने खरीप हंगामाची सुरुवात झाली. मात्र त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी पूर्णत: खचला गेला. दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ आली. कर्जाच्या ओझ्याखाली सापडलेला शेतकरी पोळ्यानंतर समाधानकारक पावसामुळे सावरणार अशी आशा निर्माण झाली होती. सर्वत्र हिरवीगार पिके आणि जोमाने वाढ होत असल्याचे दिसत होते. मात्र वरुणराजाची अवकृपा झाली. पाऊस आज पडेल, उद्या पडेल या आशेवर शेतकरी बसला आहे. परंतु पावसाने चांगलीच दडी मारल्याने कडाक्याचा ऊन पडू लागला आहे. हिरवीगार असलेली पिके आठवडाभरातच करपत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आता हिरावला जात आहे. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी बँक, सावकारचे उंबरठे झिजवून व्याजासह पैसा देण्याच्या बोलीने त्यांने खर्च केला.
महागाईच्या काळात बियाणे खरेदी करुन काळ्या आईची ओटी भरली. समाधानकारक पिके येणार, अशी अपेक्षा घेवून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात करपलेली पिके अन् अश्रूच्या धारा दिसू लागल्या आहे.
सध्या परिसरात विधानसभा निवडणुकीचे पडघम सर्वत्र वाजू लागले आहेत. शेतकऱ्यांची पीक परिस्थिती कशी आहे, हे विचारणारे कार्यकर्ते आता मतदान कुणाच्या बाजुने होणार, अशी समीकरणे जुळविण्यात व्यस्त आहेत. निसर्गाच्या हुलकावणीने खरीप हंगाम धोक्यात आहे. महत्वाचा मानला जाणारा दिवाळी सण जवळ आला आहे. नगदी पीक असलेल्या सोयाबिनच्या शेंगा भरल्या नाहीत. कापसाच्या झाडाला बोंडे लागण्याआधीच डोळ्यादेखत कपाशी करपत आहे. खासगी सावकार, बकेचे कर्ज फेडायचे, आणि दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न आता पहाडावरील शेतकऱ्यांना पडला आहे. पावसाची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास रोजगारासाठी अनेक जण स्थलांतर करण्याचीही शक्यताही नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)