शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यास विमाशि कटिबद्ध
By Admin | Updated: November 10, 2015 01:33 IST2015-11-10T01:33:44+5:302015-11-10T01:33:44+5:30
महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात विविध ज्वलंत समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यासाठी सर्व मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी ....

शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यास विमाशि कटिबद्ध
सुधाकर अडबाले : गडचांदूर येथे सत्कार
गडचांदूर : महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात विविध ज्वलंत समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यासाठी सर्व मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या मागे राहण्याचे आवाहन विमाशिचे नवनिर्वाचित सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी स्थानिक महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित सत्काराला उत्तर देताना केले.
कोरपना-जिवती तालुका विमाशीच्यावतीने शनिवारी सुधाकर अडबाले यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.डॉ. अनिल चिताडे होते. प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठलराव थिपे, प्राचार्य सुभाष पाथ्रीकर, धनंजय गोरे, विमाशीचे जिल्हा कार्यवाह शेंडे, ठाकरे, कोडलकर, नभिलास भगत, बावणे, धोपटे, सोनकुसरे, तुळशिराम पुंजेकर, गोखरे, पर्यवेक्षक गिरीधर बोबडे, उद्धव निखाडे, मुख्याध्यापक अशोक लोहे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नवनिर्वाचित सहकार्यवाह सुधाकर अडबाले यांचा सत्कार डॉ.अनिल चिताडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन करण्यात आला.
सुधाकर अडबाले यांनी सत्काराला उत्तर देताना शिक्षण क्षेत्रातील सुरू असलेला सावळागोंधळ सांगितला. दररोज नवनवीन अध्यादेश काढून शिक्षकांना वेठीस धरण्याचे कार्य शासन करीत असल्याचा आरोप करून या विरोधात शिक्षकांना न्याय देण्यासाठी विमाशि कटीबद्ध असल्याचे सांगितले. विमाशिने अनेक शिक्षकांना न्याय मिळवून दिल्याचे सांगून विमाशीला मजबूत करण्यासाठी पूर्ण वेळ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. डॉ. अनिल चिताडे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थी केंद्रीत शिक्षण धोरण शासनाने तयार करावे शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक काम देऊ नये असे सांगितले. यावेळी विठ्ठलराव थिपे यांनी विमाशीच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोडलवार यांनी केले. संचालन जिवती तालुका अध्यक्ष पाचभाई यांनी केले. आभार कृष्णा बत्तुलवार यांनी मानले. कार्यक्रमाला कोरपना, जिवती तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते. (वार्ताहर)