वनजमिनी हस्तांतरणाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST2021-03-07T05:00:00+5:302021-03-06T23:30:38+5:30
विहीरगाव व मूर्ती येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ग्रीनफिल्ड विमानतळ उभारणी संदर्भात वनजमिनींच्या हस्तांतरणाबाबत विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. या बैठकीला विमानतळ विकास कंपनीचे दीपक कपूर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, मुख्य वनसंरक्षक मंत्रालय अरविंद आपटे उपस्थित होते.

वनजमिनी हस्तांतरणाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील विहीरगाव व मूर्ती येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित ग्रीनफिल्ड विमानतळासाठी वनजमिनी हस्तांतरणाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे फेरसादर करावा, असे निर्देश वन तसेच सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वनविभागाच्या उच्चाधिकाऱ्यांना शुक्रवारी दिले.
विहीरगाव व मूर्ती येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ग्रीनफिल्ड विमानतळ उभारणी संदर्भात वनजमिनींच्या हस्तांतरणाबाबत विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. या बैठकीला विमानतळ विकास कंपनीचे दीपक कपूर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, मुख्य वनसंरक्षक मंत्रालय अरविंद आपटे उपस्थित होते. या बैठकीत आमदार मुनगंटीवार यांनी विषयाबाबत सविस्तर भूमिका विषद केली. ग्रीनफिल्ड विमानतळ उभारणीच्या दृष्टीने सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित विमानतळाच्या विकासकामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. वनजमिनी हस्तांतरणाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे, परंतु हा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याचे वनविभागाने म्हटले आहे. विमानतळाची उभारणी झाल्यास विकासाला चालना मिळेल. याबाबत फेरप्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याची गरज आहे. याप्रकरणी शासनाने कार्यवाही करण्याची मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली. सदर प्रकरणी फेरप्रस्ताव शासनाने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्याच्या दृष्टीने नस्ती मुख्यमंत्र्यांकडे सादर करावी, मुख्यमंत्र्यांना याबाबत विनंती करू, असे वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले.
नागरिक व महसूलच्या जमिनी भूसंपादित
विहीरगाव व मूर्ती येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित ग्रीनफिल्ड विमानतळासाठी नागरिकांच्या शेतजमिनी व महसूल विभागाच्या जमिनी आधीच भूसंपादित करण्यात आल्या आहेत. यासाठी नागरिकांना प्रति एकर आठ लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे. आता केवळ वनजमिनीचाच प्रश्न रेंगाळला आहे.