नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश
By Admin | Updated: May 15, 2017 00:45 IST2017-05-15T00:45:27+5:302017-05-15T00:45:27+5:30
शहरात वादळी पावसाने शनिवारी थैमान घातले. त्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी केली.

नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश
गुप्ता कुटुंबीयांचे सांत्वन : अहीर यांनी केली वादळी भागाची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरात वादळी पावसाने शनिवारी थैमान घातले. त्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी केली. यावेळी त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण नुकसानीचे सर्वेक्षण करून सर्वच नुकसानग्रस्तांना आर्थिक भरपाई मिळण्याकरीता शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
ना. अहीर यांनी लालपेठ व जलनगर परिसरात प्रत्यक्ष भेट देवून प्रभावित कुटुंबीयांशी चर्चा केली. या नुकसानीची आर्थिक भरपाई मिळेल, असे आश्वासन त्यांनी उपस्थित नागरिकांना दिले. यावेळी ना. अहीर यांनी शहरातील वाढलेल्या वृक्षांमुळे दुर्दैवी घटनामध्ये भर पडत असल्याने या वृक्षांच्या फांद्या तोडण्याची सूचना केली.
नैसर्गिक आपत्तीमुळे भविष्यात दुर्दैवी घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी तसेच लोकांचे कमीत कमी नुकसान होईल, या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावरून प्रभावीपणे उपाययोजण्याबाबत अधिकाऱ्यांनी प्राधान्याने पूर्व नियोजन करावे, अशा सूचनाही दिल्या.
लालपेठ परिसरात झाड कोसळून गुप्ता यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ना. अहीर यांनी त्या कुटुंबाचे सांत्वन केले. या पाहणीमध्ये उपमहापौर अनिल फुलझेले, भाजप गटनेते वसंत देशमुख, उपविभागीय अधिकारी गायकवाड, तहसीलदार खांडरे, नायब तहसीलदार घोरपडे, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार भगत आदी उपस्थित होते.
वादळग्रस्त भागाच्या पाहणी दौराप्रसंगी ना. हंसराज अहीर यांच्यासोबत लालपेठ प्रभागाचे नगरसेवक शाम कनकम, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक प्रशांत चौधरी, मोहन चौधरी, संजय मिसलवार, भानेश मातंगी, गणेश गेडाम, जितेंद्र धोटे, राजकुमार चौधरी, सोनकुसरे, स्वप्नील कांबळे, क्रिष्णा यादव आदी उपस्थित होते.
शेख जब्बीर कुटुंबीयांचे सांत्वन
जलनगर वॉर्डातील शेख जब्बीर यांच्या सुहाना परवीन या दीड वर्षीय मुलीचे घराजवळील नालीत पडून नुकताच दुर्दैवी मृत्यू झाला. सदर दुर्घटनेची माहिती प्राप्त होताच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या कुटुंबाच्या निवासस्थानी जावून त्यांचे सांत्वन केले. तसेच या कुटुंबाला आर्थिक मदत दिली. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपाचे गटनेते वसंता देशमुख, नगरसेवक अॅड. राहुल घोटेकर, मोहन चौधरी आदींची उपस्थिती होती. अशा दुर्घटना भविष्यात घडू नय, यासाठी महानगरातील प्रत्येक प्रभागातील नाल्याची स्वच्छता तुंबलेल्या नाल्या व गाळ मिश्रित नाल्या व मोठे नाले सदैव स्वच्छ राहतील, याची दक्षता मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचनावजा अपेक्षा ना. अहीर यांनी व्यक्त केल्या.