इतर भेटवस्तूऐवजी नवरदेवाला पुस्तकांचा अहेर
By Admin | Updated: May 31, 2017 01:55 IST2017-05-31T01:55:25+5:302017-05-31T01:55:25+5:30
लग्न संमारंभात मोठमोठे बक्षीस अहेर म्हणून मिळावे, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र पोंभुर्णा तालुक्यातील

इतर भेटवस्तूऐवजी नवरदेवाला पुस्तकांचा अहेर
विवाहाची सर्वत्र चर्चा : पत्रिकेतून पुस्तक देण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लग्न संमारंभात मोठमोठे बक्षीस अहेर म्हणून मिळावे, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र पोंभुर्णा तालुक्यातील पिपरी देशपांडे येथील रहिवासी नितेश गोहाणे याने या मानसिकतेला फाटा देत आपल्या लग्नात भेटवस्तू म्हणून पुस्तक देण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसात देत पाहुणे मंडळीनी त्यांना इतर बक्षिसांऐवजी पुस्तकांचा अहेर दिला.
पोंभूर्णा येथील नितेश गोहणे हे सध्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व अतिदुर्गम भागातील आष्टी या पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक या पदावर सेवा देत आहेत. त्याचा विवाह राजुरा येथील राजश्री तुळशिराम वाकूडकर हिच्याशी नुकताच पार पडला. नितेश हा गरीब घरचा, एका शेतकऱ्याचा मुलगा. अनेक नामवंत लेखकांकडून प्रेरणा घेत स्पर्धा परीक्षेची तयारी करून चिकाटी व मेहनतीने पोलीस उपनिरीक्षक झाला. पुस्तकातून मानवाचा विकास होत असतो, ही जाणीव झाल्यामुळे त्याने आपल्या लग्न पत्रिकेत वृक्षांचे महत्व, शिक्षणाचे महत्व, थोर विचारवंतांचे विचार, नमूद करून तशी लग्नपत्रिका छापली. एवढेच नाही तर ‘नको अहेर, नको हार, करू फक्त पुस्तकांचा स्विकार’ असा संदेश पत्रिकेच्या माध्यमातून दिला. यावेळी नितेशचे नातलग लक्ष्मण सोनुले यांनी विश्वास नांगरे पाटील यांचे प्रेरणादायी पुस्तक मूल येथील त्यांचे मित्र अमित राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक भेट दिली.