वीज तारांना ट्रेसर बसवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST2021-07-23T04:18:18+5:302021-07-23T04:18:18+5:30
वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान चंद्रपूर : वन्यव्याप्त परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे वन्य प्राण्यांकडून प्रचंड नुकसान होत असल्याने ...

वीज तारांना ट्रेसर बसवावे
वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान
चंद्रपूर : वन्यव्याप्त परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे वन्य प्राण्यांकडून प्रचंड नुकसान होत असल्याने महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतींचा पंचनामा करावा आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, मूल, नागभीड, गोंडपिपरी आदी तालुक्यातील गावांना जंगल लागून आहे.
डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरातील काही भागांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक परिसरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याही तुंबल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने लक्ष देऊन स्वच्छतेवर भर द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
इंटरनेटअभावी शेकडो ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश गावात इंटरनेटसेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, काही बँकांमध्येही हीच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत रहावे लागते. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
व्यायाम साहित्याची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : शहरातील काही परिसरामध्ये लावण्यात आलेल्या व्यायाम साहित्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिल्या जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सदर साहित्याची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरातील क्रीडा संकुल, सिव्हिल लाइन, सरकार नगर, हरिओम नगर, नगिनाबाग आदी परिसरात व्यायाम साहित्य लावण्यात आले आहे; मात्र नागरिकांच्या चुकीच्या वापरामुळे अल्पावधितच संपूर्ण साहित्य मोडकळीस आले आहेत.
दुकानांत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत. असे असतानाही काही किराणा दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे वेळीच आळा घालणे गरजेचे आहे; मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
पाणंद रस्त्याची समस्या सोडवा
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही पाणंद रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित असल्याने पावसाळ्यात शेकडो शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागतो. गावाच्या नकाशावर शेत, रस्ते, पाणंद रस्त्यांची नोंद आहे; परंतु काहींनी या रस्त्यांवर अतिक्रमण केले. शेतीची मशागत व बांधबंदिस्ती करताना झाडे-झुडपी वाढली. अतिक्रमण केल्याने पाणंद रस्ते गायब झाले. याकडे महसूल प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : प्रशासनाने व्यावसायिकांना शिथिलता दिली आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहत आहेत; मात्र बाजारामध्ये नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. परिणामी, वाहतूक कोंडी नित्याचिच झाली आहे. चंद्रपूर शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडीवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बेरोजगार युवकांची अडवणूक थांबवावी
चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंद असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़; मात्र बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ महाविद्यालयांची संख्या वाढल्याने शिक्षणाचे प्रमाणही वाढले़ त्या तुलनेत रोजगार उपलब्ध नाही़ त्यामुळे युवक-युवती स्वयंरोजगाराचा पर्याय स्वीकारत आहेत़
मोकाट जनावरांचा हैदोस
वरोरा : चौपदरी महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. जनावरांमुळे वाहनांचे अपघात झाले. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
स्वच्छता मोहीम राबवावी
चंद्रपूर : शहरातील काही परिसरातील नाल्यांचा उपसा झाला नाही. त्यामुळे सांडपाण्याने तुंबल्या. पावसाळा सुरू असल्याने अस्वच्छतेमुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. मनपाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे.
केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा
चंद्रपूर : केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, पीक विमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना राबविल्या जात आहेत. अधिकाऱ्यांकडून माहिती पोहोचत नसल्याने पात्र नागरिकांना योजनांचा लाभ मिळत नाही.
कोरपना येथे एमआयडीसी उभारावी
चंद्रपूर : औद्योगिक तालुका म्हणून कोरपनाची ओळख आहे; मात्र गडचांदूर, नारंडा, सोनुर्ली, विरूर वगळता कोरपना, पारडी, कोडशी भागात उद्योगधंदेच नसल्याने परिसरातील बेरोजगारांच्या हाताला काम नाही. त्यामुळे या क्षेत्रात एमआयडीसीची स्थापना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात चार सिमेंट उद्योग, एक कोळसा खाण, दहा जिनिंग-प्रेसिंग कारखाने आहे.
शहरातील रस्त्यांवर बांधकाम साहित्य
चंद्रपूर : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकले जाते. यामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.