दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकरांचा अष्टधातूचा पुतळा उभा करण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST2021-01-13T05:11:18+5:302021-01-13T05:11:18+5:30
फोटो चंद्रपूर : चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर १९५६ मध्ये १६ ऑक्टोबर रोजी तीन लाख लोक बुद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी आले होते. ...

दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकरांचा अष्टधातूचा पुतळा उभा करण्यासाठी प्रयत्न करणार
फोटो
चंद्रपूर : चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर १९५६ मध्ये १६ ऑक्टोबर रोजी तीन लाख लोक बुद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी आले होते. महामानव बाबासाहेबांनी दीक्षा नागपूर आणि चंद्रपूर येथेच दिली, हे विशेष महत्त्वाचे आहे. दीक्षाभूमीवर येताना पवित्र भावना मनात निर्माण होते. प्रज्ञा, शील, करुणेचा दिव्य संदेश देणाऱ्या चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अष्टधातूचा पुतळा उभा करण्यासाठी आपण येत्या काळात प्रयत्न करू, असे आश्वासन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख, माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या लोकार्पण सोहळयात आमदार सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी अरुण घोटेकर, अशोक घोटेकर, महापौर राखी कंचर्लावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, उपमहापौर राहुल पावडे, मनोहर खोब्रागडे, सखाराम पालतेवार, प्राचार्य राजेश दहेगावकर, कुणाल घोटेकर आदींची उपस्थिती होती.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्रिपदाच्या कार्यकाळात दोन कोटी रुपये निधी खर्चून बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.
यावेळी महापौर राखी कंचर्लावार, अशोक घोटेकर यांचीही भाषणे झालीत. प्रास्ताविक मनपा सदस्य राहुल घोटेकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.