शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी आठवडी बाजारात सुरू केले माहिती केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:44 IST2018-06-23T22:44:27+5:302018-06-23T22:44:50+5:30
शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन मिळावे, यासाठी अंबुजा सिमेंट फाउंडेशनतर्फे राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे आठवडी बाजारात माहितीचे केंद्र सुरू करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी आठवडी बाजारात सुरू केले माहिती केंद्र
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन मिळावे, यासाठी अंबुजा सिमेंट फाउंडेशनतर्फे राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे आठवडी बाजारात माहितीचे केंद्र सुरू करण्यात आले.
माहिती केंद्रातून गुलाबी बोंडअळी, माती परीक्षण, बियाण्यांची लागवड कशी करायची, कीटकनाशक वापरताना दक्षता कशी घ्यावी. आधुनिक शेतीसाठी कृषी योजना व अन्य पैलुंवर मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय, त्यासंबंधीचे माहिती पत्रकही शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. शेतीविषयक चित्रपटही दाखविण्यात आला. या चित्रपटातून शेतकऱ्यांना शेतीच्या नाविण्यपूर्ण प्रयोगाची माहिती मिळाली. अंबुजा फाऊंडेशनचे उत्पादक व्यवस्थापक प्रीतम कोरे, विशाल भोगावार, सिद्धेश्वर जंपलवार, दिनेश वांढरे, सुचिता खडसे, दीपक साळवे, सुभाष बोबडे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम आठवडी बाजारात राबविण्यात आला. प्रकल्प क्षेत्र अधिकारी गोपाल जंबुलवार, रूपेश गेडेकर, महेश झाडे, हरी बोढे, साईनाथ पिंपळशेंडे, प्रदीप बोबडे, अश्विनी जेनेकर आदींनी अंबुजा फाऊंडेशनअंतर्गत शेतकऱ्यांसाठ सुरू केलेल्या योजनांचीही माहिती दिली. या माहिती केंद्राला पाचगाव, चंदनवाही, साखरवाही, कोची, खामोना, अहेरी, पांढरपौनी व रानवेली परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेतला. गावागावांत जाऊन शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी जागृती करण्याचा संकल्प अंबुजा सिमेंट फाऊंडेशनने केला आहे.
तालुक्यात सुरू केलेल्या कृषी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शेतकऱ्यांशी यापुढेही सुसंवाद ठेवण्यात येणार आहे. यादृष्टीने शेतीसोबच विविध उपक्रमांचे नियोजन सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.