तूर, मिरची पिकावरही वातावरणाचा प्रभाव
By Admin | Updated: November 6, 2016 01:01 IST2016-11-06T01:01:28+5:302016-11-06T01:01:28+5:30
हलक्या वाणाच्या धानाची कापणी होऊन सध्या मध्यम व भारी वाणाच्या धानाची कापणी सुरू झाली आहे.

तूर, मिरची पिकावरही वातावरणाचा प्रभाव
मजुरांची टंचाई : शेतकरी स्वत: करीत आहेत फवारणी
चंद्रपूर : हलक्या वाणाच्या धानाची कापणी होऊन सध्या मध्यम व भारी वाणाच्या धानाची कापणी सुरू झाली आहे. मागील दोन तीन दिवसांपासून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे त्याचा थेट परिणाम पिकावर बसलेला दिसत आहे. आता धानपिकासह तूर व मिरची पिकालाही या वातावरणाच्या फटक्यामुळे रोगराईला सामोरे जावे लागत आहे.
सध्या दिवाळीचा हंगाम असल्याने शेतकऱ्याना शेतमजूरी मिळणे कठिण झाले आहे. त्यामुळे कुटुंबातील व गावातील काही मजुरांना घेऊन अनेक शेतकरी पिकाची कापणी करावी लागत आहे. पण जिल्ह्यात काही भागात तूर व मिरची पिकाचे उत्पादन घेतले होते. मागील दोन वर्षांपासून तूर डाळीलाही चांगला भाव मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन ही वाढविले आहे. हिरव्या मिरचीला परराज्यात मोठी मागणी असल्याने व्यापारी शेतकऱ्याजवळून मिरच्या विकत घेऊन दुकाने माल दुसऱ्या राज्यात पाठवितात. परंतु या पिकावरही रोगराईचे सावट निर्माण झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात भरघोस तुरीचे उत्पादन होणार असे चिन्ह दिसत असतांनाच ढगाळ वातावरणाने अळीचा प्रादुर्भाव तुर पिकावर झालेला आहे.दिवाळी सणाचा पर्व असल्याने आता शेतऱ्यांना शेतमजूरही मिळणे कठीण झाले. शेतमजुरांना एक दिवसाची मजुरी २५०-३०० रुपयेदेऊनही शेतात औषधाची फवारणी करण्याकरीता मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी स्वत:च फवारणी यंत्राद्वारे तूर व मिरची पिकावर औषधी फवारणी करीत आहे. (प्रतिनिधी)