सिंदेवाहीत आरोग्य यंत्रणा कोलमडली
By Admin | Updated: October 15, 2015 01:09 IST2015-10-15T01:09:01+5:302015-10-15T01:09:01+5:30
तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहे. शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण वाऱ्यावर आहेत.

सिंदेवाहीत आरोग्य यंत्रणा कोलमडली
औषधसाठा नाही : तालुक्यातील रुग्ण वाऱ्यावर
सिंदेवाही : तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहे. शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण वाऱ्यावर आहेत. सुविधाच्या नावाने बोंबोबोंब आहे. तरीही सर्वकाही ठिकठाक असल्याचे प्रत्येकवेळी दाखविले जाते. यामुळे नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील डॉक्टर आणि कर्मचारी, तज्ज्ञ हे कुणी पदाधिकारी वा अधिकारी येण्याची कुणकुण लागताच लिपापोती करण्यात मग्न होतात. क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी काही महिन्यापूर्वी भेट दिली असता औषधी व डॉक्टराचा अभाव दिसला. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना त्वरित डॉक्टरांची नेमणूक करावी, असे ठणकाविले होते. काही महिन्यानंतर तीच अवस्था ग्रामीण रुग्णालयाची आहे. आरोग्य सेवेचे तालुक्यात धिंडवले उडाले आहे. रुग्णांवर आवश्यक तेव्हा उपचार होत नाही. त्यामुळे रुग्ण दगावल्याचे घटनाही घडलेल्या आहेत. महिला वैद्यकीय अधिकारी नसल्याने साधारण आजारासाठी रुग्णांना चंद्रपूर- गडचिरोलीला रेफर करण्याचा आजारच या रुग्णालयाला जडला आहे. रात्री वैद्यकीय सेवा बरोबर मिळत नाही. केवळ १० ते ४ या वेळातच डॉक्टर उपस्थित असतात. आरोग्य सेविका आणि इतर कर्मचारी रुग्णांशी उध्दटपणे वागतात. यापेक्षा भयंकर स्थिती म्हणजे रुग्णालयात औषधाचा साठा कधीच उपलब्ध राहत नाही.
मेंदूज्वर, हिवताप, डेंग्यू, मलेरिया अशा रोगावर त्वरित उपचार होत नसल्याचा आरोप ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांनीच केला. त्यामुळेच सिंदेवाहीत खासगी डॉक्टराचे मोठे फावत आहे. (शहर प्रतिनिधी)