बल्लारपूर तालुक्यात औद्योगिक विकास खुंटला
By Admin | Updated: August 14, 2016 00:32 IST2016-08-14T00:32:05+5:302016-08-14T00:32:05+5:30
चंद्रपूर तालुक्याचे विभाजन २५ वर्षांपूर्वी करण्यात आले. त्यानंतर बल्लारपूर तालुका १४ मार्च २००२ ला अस्तित्वात आला.

बल्लारपूर तालुक्यात औद्योगिक विकास खुंटला
प्रशासनाचे दुर्लक्ष : एमआयडीसी वसाहत नाही
अनेकश्वर मेश्राम बल्लारपूर
चंद्रपूर तालुक्याचे विभाजन २५ वर्षांपूर्वी करण्यात आले. त्यानंतर बल्लारपूर तालुका १४ मार्च २००२ ला अस्तित्वात आला. तालुक्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एमआयडीसी वसाहत होणे गरजेचे आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षितपणाच्या धोरणामुळे बल्लारपूर तालुक्यात एमआयडीसीची स्थापना करण्यात आली नाही. परिणामी तालुक्याचा औद्योगिक विकास मंदावला असून बेरोजगारीचे संकट वाढले आहे.
बल्लारपूर शहरात जागतिक दर्जाचा पेपर मिल उद्योग, वेकोलिच्या कोळसा खाणी, पाईप उद्योग, साग लाकडाचे आगार, खर्डा उद्योगाच्या माध्यमातून कामगारांना रोजगार मिळत आहे. यातील बरेच उद्योग डबघाईस आले आहेत. बल्लारपूर तालुक्यातील वीज औष्णिक केंद्र, प्लायवूड कंपनी, चुना फॅक्टरी कित्येक वर्षांपासून बंद झाले आहेत. उद्योगाचे पुनर्गठन करण्याच्या अनुषंगाने यापूर्वी बल्लारशाह औष्णिक वीज केंद्राच्या तब्बल १०५ हेक्टर पडित जागेवर औद्योकि वसाहत उभी करण्याचे सुतोवाच जनप्रतिनिधीने केले होते. मात्र ती घोषणा हवेत विरली. यामुळे बल्लारपूर तालुक्यात बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
बल्लारपूर तालुका निर्मितीनंतर तालुक्यात शासन स्तरावरुन एमआयडीसी वसाहतीचे नियोजन करणे क्रमप्राप्त होते. मात्र राजकीय इच्छाशक्तीअभावी औद्योगिक वसाहतीचे स्वप्न आजतागायत साकार झालेच नाही. यामुळे बेरोजगारीची समस्या कायम आहे. बल्लारपूर तालुका वनक्षेत्राला लागून आहे. महसूल प्रशासनाची जागा सैनिकी शाळा व काही बॉटनिकल गार्डन निर्माण करण्यासाठी आरक्षित करण्यात आली. त्यामुळे भविष्याचा वेध घेताना तालुक्यात एमआयडीसी निर्माण करण्यासाठी जागा शोधण्याची वेळ औद्योगिक विकास महामंडळावर येणार आहे.
एमआयडीसी अस्तित्वात न आल्यामुळे लहान मोठे उद्योजक अडचणीत आले आहेत. शहरातील पाईप फॅक्टरीसारख्या उद्योगावर अवकळा आली आहे. एकमेव मोठा पेपर मिल उद्योग कच्च्या मालाअभावी संकटाच्या सावटात सापडला. काही उद्योग तालुक्यातून हद्दपार झाले आहेत.
त्यामुळे तालुक्यात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी बल्लारपूर तालुक्यात राजकीय इच्छाशक्तीला जागृत करून एमआयडीसीची स्थापना होणे, काळाची गरज आहे.