मूलवासीयांना मिळणार मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:26 IST2021-03-25T04:26:47+5:302021-03-25T04:26:47+5:30

फोटो : पत्रपरिषदेत माहिती देताना नगराध्यक्ष रत्नमाला भोयर व पदाधिकारी मूल : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मूल ...

Indigenous people will get abundant water | मूलवासीयांना मिळणार मुबलक पाणी

मूलवासीयांना मिळणार मुबलक पाणी

फोटो : पत्रपरिषदेत माहिती देताना नगराध्यक्ष रत्नमाला भोयर व पदाधिकारी

मूल :

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मूल शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेची किंमत २८ कोटी ८८ लाख रुपये इतकी आहे. कोल्हापूर येथील लक्ष्मी सिव्हिल इंजिनियरींग सर्व्हिसेस कंपनी या योजनेचे काम उत्कृष्टरीत्या करीत आहे. त्यामुळे मूलवासीयांना लवकरच दोनदा मुबलक पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती येथील नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मूल शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आणि व्याप्ती लक्षात घेता ही वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. २०.३ लक्ष लिटर पाण्याची साठवण क्षमता आहे. याद्वारे एकूण ४० लक्ष लिटर पाणी दररोज मूल शहराला पुरवठा करण्यात येत आहे. हे प्रमाण आधीच्या तुलनेत अडीच पट असल्याचे भोयर यांनी यावेळी सांगितले. मूल शहरात नळधारकांची संख्या ४६३१ आहे. त्यानुसार सर्व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस शासकीय मानकानुसार १३५ लिटर प्रति व्यक्ती प्रति दिवस पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणी पुरवठ्याची व्याप्ती ३५ टक्क्यांवरून ७५ टक्के एवढी झालेली आहे. मूल शहरातील सर्व नळांना मीटर लावण्याचे काम नगर परिषदेने हाती घेतले आहे. आतापर्यंत चार हजार नळांना मीटर लावण्याचे काम पूर्ण झाले आहे.

पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष नंदू रणदिवे, पाणी पुरवठा सभापती अनिल साखरकर, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, शिक्षण सभापती मिलिंद खोब्रागडे उपस्थित होते.

बॉक्स

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटींची तरतूद

संपूर्ण मीटर लावल्यानंतर या योजनेंतर्गत स्वयंचलित २४ तास पाणी पुरवठा नागरिकांच्या सेवेत दाखल होईल. पाणी पुरवठा योजना राबवित असताना खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी रुपयांची कामे करण्यात येत असल्याची माहिती आणि मूल शहरातील आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली इतर विकास कामांची माहिती नगराध्यक्ष भोयर यांनी यावेळी दिली.

बॉक्स

शिवसेनेचे आरोप बिनबुडाचे

पाणी पुरवठा योजनेत कोणताच गैरप्रकार झालेला नाही. संबंधित कंत्राटदार निकषांप्रमाणे काम करीत आहे. त्यामुळे शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती अनिल साखरकर यांनी यावेळी सांगितली.

Web Title: Indigenous people will get abundant water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.