ब्रम्हपुरी तालुक्यात वाघांच्या संख्येत वाढ
By Admin | Updated: May 29, 2017 00:28 IST2017-05-29T00:28:42+5:302017-05-29T00:28:42+5:30
दिवसेदिवस वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात वाढ होत आहे. मानवी जीवन असुरक्षित होत चालले आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यात वाघांच्या संख्येत वाढ
तुलनेत जंगलक्षेत्र कमी
रवी रणदिवे । लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी: दिवसेदिवस वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात वाढ होत आहे. मानवी जीवन असुरक्षित होत चालले आहे. काही ना काही घटना दररोज कुठे ना कुठे घडत असल्याचे निर्दक्षनास येत आहे. आतापर्यंत मानवि जिवासह अन्य पाळीव प्राणी शेकडो च्या घरात फस्त केल्या आहेत या साऱ्या प्रकरणावरून ब्रम्हपुरी तालुका वाघांची राजधानी असल्याचे एकूण घडामोडीवरून दिसून येत आहे.
ब्रम्हपुरी उपवनपरिक्षेत्रात ब्रम्हपुरीसह नागभीड, चिमूर, सिंदेवाही या तालुक्यांचा समावेश आहे, तर ब्रम्हपुरी उत्तर व दक्षिण वनपरिक्षेत्रात विभागल्या गेला आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात उत्तरेकडे सायगाटा जंगल तर दक्षिणेकडे एकारा (भूज) जंगलाने परिक्षेत्र विभागला गेला आहे. तसे पाहिल्यास विदर्भात ३३ टक्के जंगलाने भाग व्यापलेला आहे. त्यामुळे प्राण्यांचा वावर विदर्भात मोठ्या प्रमाणात होत असून ब्रम्हपुरीच्या दक्षिण वनपरिक्षेत्रात वाघांची संख्या ४० हून अधिक असल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रानुसार प्राप्त झाली आहे. घर लहान व कुटूंबाची संख्या जास्त असेल तर कोणत्यातरी कुटुंबाला बाहेर पडून स्थलांतर करून राहाणे भाग आहे. हाच नियम प्राण्यांच्या बाबतीत लागू होत असतो. दक्षिण वनपरिक्षेत्रात वाघांची संख्या ४० हून अधिक झाल्याने प्रत्येकाला आपले क्षेत्र बनवून राहावे लागत असते. परंतु दर अडीच वर्षानंतर मादी वाघ पिलांना जन्म देते. अडीच वर्षांपूर्वी या क्षेत्रातही एका वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला.हे बछडे मोठे होऊ लागताच वाघिणीपासून विभक्त होत असतात. अशावेळी हे बछडे मोठे होऊन आपले क्षेत्र तयार करण्यासाठी धडपड करीत असतात. प्रसंगी गावाकडे शिकार व आपले क्षेत्र बनविण्यासाठी येत असतात. यातून मग अनुचित घटना घडत असतात. एक वाघ दुसऱ्या वाघाच्या क्षेत्रात गेल्यास वाघांची झुंज होऊन एका वाघाचा बळी जातो. अशाही घटना घडल्या आहेत. मानव व वन्यप्राणी सुरक्षित राहण्यासाठी जंगल क्षेत्राच्या तुलनेत अतिरिक्त झालेल्या वाघांचे स्थलांतर करणे हा एकमेव मार्ग असल्याचे बोलले जात आहे. अन्यथा मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढत जाऊन त्यात मानवाचा आणि वन्यप्राण्यांचा बळी जात राहील. दक्षिण वनपरिक्षेत्राची सिमा व वाघांची संख्या यांचे प्रमाण विषम आहे. वाघ आणि त्यांचे प्रजनन यासाठी या भागातील वातावरण पोषक असल्याने वाघाची संख्या वाढत चालली आहे. त्या मानाने जंगल कमी पडत आहे. त्यामुळे ज्या भागात जंगल आहे, पण प्राण्यांची संख्या नगण्य आहे. अशा भागात वाघांचे स्थलांतर केले तर परिस्थिीत नक्कीच बदल घडू शकतो, असेही तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. परंतु स्थलांतराची प्रक्रिया राबविण्यासाठी विभागात गांभीर्याने विचार व्हायला हवा. लोकप्रतिनिधी व वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तरच परिस्थिती सुधारू शकणार आहे.