आशा वर्करच्या मोबदल्यात वाढ करा

By Admin | Updated: August 15, 2015 01:27 IST2015-08-15T01:27:37+5:302015-08-15T01:27:37+5:30

आशा वर्करचा मेळावा रफिका कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली आनंद भवन भानापेठ वॉर्ड येथे घेण्यात आला.

Increase the Asha Worker's Compensation | आशा वर्करच्या मोबदल्यात वाढ करा

आशा वर्करच्या मोबदल्यात वाढ करा


चंद्रपूर : आशा वर्करचा मेळावा रफिका कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली आनंद भवन भानापेठ वॉर्ड येथे घेण्यात आला. यात आशा वर्करच्या मोबदल्यात वाढ करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात संध्या नामपल्लीवार म्हणाल्या, बाल मृत्यू तथा माता मृत्यू कमी करण्याची जबाबदारी ज्या आशा वर्करकडे देण्यात आली आहे, त्या आशा वर्करला वेतन दिले जात नाही. तसेच निश्चित असे मानधन नाही. दिला जातो तो कामाचा मोबदला. गेल्या सहा वर्षाच्या कार्यकाळात टीए, डीए म्हणून ३०० रुपये दिल्या जातात. या सहा वर्षाच्या काळात महागाई गगनाला भिडली असली तरी तिच्या बैठकभत्यात वाढ झाली नाही. इंदू पिंगे म्हणाल्या, निरनिराळ्या कामाचा मोबदला सांगितल्या गेला आहे. परंतु दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात पाच वर्षाचा कार्यकाळ लोटूनही वाढ करण्यात आली नाही.
बीपीएल, महिलेच्या प्रसुतिकरिता ६०० रुपये मोबदला दिला जातो. परंतु ती महिला एपीएलमध्ये असेल तर मोबदला दिला जात नाही. महिलेच्या प्रसुतिकरिता एपीएल, बीपीएल भेद नष्ट करावा, अशी मागणी त्यांनी केली. प्रा. दहीवडे म्हणाले, पश्चिम बंगाल, हरियाणा, राजस्थानमध्ये आशा वर्करला मानधन दिले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने किमान एक हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केलीे. आभार रफिका कुरेशी यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्याकरिता अभंगा चहांदे, मनिषा सारंगधर, सीमा सुखदेवते, लता ठिकरे यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Increase the Asha Worker's Compensation