ग्रामपंचायत सदस्यांच्या भत्त्यात वाढ
By Admin | Updated: September 18, 2014 23:32 IST2014-09-18T23:32:13+5:302014-09-18T23:32:13+5:30
शासनाने सरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ करीत दिवाळीची भेट दिली आहे. सरपंचांना लोकसंख्येनुसार देण्यात येणाऱ्या मानधनात ७५ टक्के अनुदान राज्य शासन देणार आहे. तर २५ टक्के अनुदान

ग्रामपंचायत सदस्यांच्या भत्त्यात वाढ
खडसंगी : शासनाने सरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ करीत दिवाळीची भेट दिली आहे. सरपंचांना लोकसंख्येनुसार देण्यात येणाऱ्या मानधनात ७५ टक्के अनुदान राज्य शासन देणार आहे. तर २५ टक्के अनुदान हे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून दिले जाणार आहे. सरपंचांच्या मानधनाबरोबर ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठक भत्त्यातही तब्बल आठ पटीने वाढ करण्यात आली आहे.
गावाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना नाममात्र २५ रुपये बैठक भत्ता देण्यात येत होता. त्यामुळे सदस्य बैठकीला हजर राहणे टाळत होते. ही बाब लक्षात आल्याने शासनाने आता ग्रामपंचायत सदस्याचा बैठक भत्ता २५ रुपयावरून तब्बल २०० रुपये केल्याने ग्रामपंचायत सदस्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या कामकाजात सहभागी होण्याविषयी गोडी निर्माण होणार आहे.
मासिक बैठकीकडे पाठ फिरविणाऱ्या सदस्यांची वाढत्या भत्त्यामुळे बैठकांना उपस्थिती वाढणार आहे. यापूर्वी दोन हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना ६०० रुपये तर त्यावरील लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना ८०० रुपये दरमहा मानधन दिले जात होते. शासनाच्या निर्णयानुसार नव्याने हे मानधन एक हजार, दीड हजार आणि दोन हजार रुपये करण्यात आले आहे तर सदस्यांना बैठक भत्ता सरसकट वाढवून २०० रुपये करण्यात आला आहे. (वार्ताहर)