आदिवासी वसतिगृहाचे उद्घाटन
By Admin | Updated: August 18, 2016 00:35 IST2016-08-18T00:35:45+5:302016-08-18T00:35:45+5:30
आदिवासी विद्यार्थ्यांना समाजात इतरांच्या बरोबरीत संधी मिळावी यासाठी राज्यातील २५ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना ...

आदिवासी वसतिगृहाचे उद्घाटन
सुधीर मुनगंटीवार : आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश मिळवून देणार
मूल: आदिवासी विद्यार्थ्यांना समाजात इतरांच्या बरोबरीत संधी मिळावी यासाठी राज्यातील २५ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळांच्या माध्यमातुन शिक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त आणि नियोजन, वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आदिवासी समाजबांधवांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असल्याची तसेच आदिवासी समाजबांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार असल्याची ग्वाही यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
चंद्रपूर जिल्हयातील मूल शहरात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर आदिवासी विकास विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या ७५ विद्यार्थी क्षमता असलेल्या १ कोटी ७७ लक्ष रूपये निधी खर्चुन बांधण्यात आलेल्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे उदघाटन आदिवासी विद्यार्थिनीच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपिठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, नगराध्यक्षा रिना थेरकर, जि.प. सभापती देवराव भोंगळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सुरेश वानखेडे, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता बालपांडे, उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, प्रभाकर भोयर, चंद्रकांत आष्टनकर, नंदू रणदिवे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, आदिवासी समाजाने शेकडो वषार्पासून पर्यावरण संरक्षणाचे काम केले आहे. आदिवासी समाजातील प्रत्येक बेघर व्यक्तीला स्वत:चे हक्काचे घर २०१९ पूर्वी मिळवून देण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे. चंद्रपूर जिल्हयात अशी १२ वसतीगृहे उभारण्यात येत आहे. यातील पहिल्या वसतीगृहाचे उदघाटन आज झाले आहे. येथील विद्यार्थ्यांना समाजात आदर्श निर्माण करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी देशभक्तांच्या चरित्रावरील पुस्तकांचे वाचनालय येथे सुरू करा, या वाचनालयासाठी पुस्तके मी नि:शुल्क उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
आदिवासी समाजाचा मानबिंदू असलेले शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे भव्य स्मारक या जिल्हयात आपण उभारणार आहोत, शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतिप्रित्यार्थ टपाल तिकीट प्रकाशित करून कोरपना येथे एक कोटी रूपये खर्च करून आदिवासी समाजासाठी सभागृह बांधण्यात येणार आहे. तसेच आदिवासी समाजासाठी सभागृहे बांधण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
मूल शहराला अव्वल क्रमांकाचे शहर करणार
मूल: शहराचा विकास वेगाने होत असून शहरात २० कोटी रूपये निधी खर्च करून सिमेंट रस्त्यांच्या कामांचे भूमीपूजन आज करण्यात येत आहे. मूल शहरात अत्याधुनिक स्वरूपाचे बस स्थानक उभारण्याची तयारी पूर्ण झाली आहे. केवळ रस्ते विकासासाठी ३० कोटी रूपय व इतर रस्त्यांसाठी ४५ कोटी रूपये असा एकुण ७५ कोटी रूपये निधी मूल शहरासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. मूल शहर अव्वल क्रमांकाचे शहर करण्याचा निर्धार आपण केला आहे. शहरात माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांच्या स्मारकाचे बांधकाम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम, प्रशासकीय भवनाचे बांधकाम अशी विविध विकासकामे आपण केली असून मूल शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण लवकरच करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या आधीच्या राज्य सरकारने चंद्रपूर जिल्हयाच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. जिल्हयात पाच वर्षात केवळ १९० कोटी रू. निधी रस्त्यांसाठी गेल्या सरकारने दिला. आम्ही वर्षभरात ३४२ कोटी रू. निधी जिल्हयातील रस्त्यांसाठी उपलब्ध करून विकासाप्रति असलेली आमची बांधीलकी स्पष्ट केली आहे.मूलसह चंद्रपूर आणि बल्लारपूर येथील रेल्वे स्थानके आदर्श आणि सुसज्ज असावी, अशी आमची भूमिका असून यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी या जिल्हयाचा दौरा करावा, अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे, असेही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी पारंपरिक आदिवासी नृत्याच्या माध्यमातून वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत करण्यात आले, हे विशेष.