विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
By Admin | Updated: February 6, 2016 00:54 IST2016-02-06T00:52:19+5:302016-02-06T00:54:01+5:30
नागपूर विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते शुक्रवारी क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आले.

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
चंद्र्रपूर : नागपूर विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते शुक्रवारी क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आले.
जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, महसूल उपआयुक्त प्रदीपकुमार डांगे, सहआयुक्त सुधाकर कुळमेथे, अपर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी विभागीय क्रीडा स्पर्धा चंद्र्रपूरमध्ये आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. महसूल विभागीतील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय काम हाताळताना टिमवर्कची आवश्यकता असते असे सांगून खेळामध्येसुध्दा सांघिक भावना जोपासली जाते. याचाच फायदा आपण प्रशासकीय काम करताना घ्यावा व आनंददायी जीवनाचा मूलमंत्र खेळातून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी डॉ.म्हैसेकर म्हणाले, महसूल विभागात काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. या विभागाच्या अंतर्गत विविध समित्यांचे दायित्व स्विकारताना अनेकदा त्याचा मानसिक ताण कर्मचाऱ्यांवर पडत असतो. जोपर्यंत शारीरिक व मानसिकदृष्ट्या आपण सुदृढ राहणार नाही, तोपर्यंत प्रशासकीय कामाची गती वाढणार नाही. त्यामुळेच खेळातून या समस्याची उकल होऊ शकते. खेळातून सांघिक भावना, शिस्त, जिद्द इत्यादी बाबी आत्मसात होतात व आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकतो. खेळासोबत योग साधनेव्दारे कर्मचाऱ्यांनी मानसिक संतुलन टिकवण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी आ. नाना शामकुळे यांनीही खेळाचे महत्त्व विषद करुन सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. नागपूर विभागाचे महसूल उपआयुक्त प्रदीपकुमार डांगे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी महसूल क्रीडा पुस्तिकेचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने यांनी मानले. ७ फेब्रुवारीपर्यंत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू राहील. (प्रतिनिधी)