जिवती तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न तातडीने निकाली काढणार
By Admin | Updated: February 22, 2015 01:01 IST2015-02-22T01:01:23+5:302015-02-22T01:01:23+5:30
गेल्या अनेक वर्षापूर्वी मराठवाड्यातून स्थलांतरित होऊन जिवती तालुक्यात स्थायी झालेल्या नागरिकांना जमीन आहे; पण मालकी हक्क नाही.

जिवती तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न तातडीने निकाली काढणार
जिवती : गेल्या अनेक वर्षापूर्वी मराठवाड्यातून स्थलांतरित होऊन जिवती तालुक्यात स्थायी झालेल्या नागरिकांना जमीन आहे; पण मालकी हक्क नाही. वास्तव्य आहे पण तीन पिढीचा पुरावा नाही, यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळग्रस्त निधीपासून वंचित राहावे लागत आहे तर विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या कागदपत्राअभावी शासकीय नोकरीत, स्पर्धेत भाग घेता येत नाही. अशा अनेक समस्याला तोंड देणाऱ्या समाजाचे प्रश्न तातडीने निकाली काढू, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री संजय राठोड यांनी जिवती येथे काल शुक्रवारी आयोजित सेवालाल महाराज जयंती कार्यक्रमात बोलताना दिली.
यावेळी ते पुढे म्हणाले, दिवसेंदिवस निसर्ग दगा असल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यावर शेतकऱ्यांनी खचून न जाता आपल्या मुलाबाळांना शिक्षणाकडे वळवावे. कारण शिक्षणामुळेच आपला विस्कटलेला समाज संघटित होईल व आपल्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करेल. तेव्हाच आपल्या तांड्या-तांड्यात विस्कटलेल्या समाज घटकाचा विकास होईल. गेल्या अनेक वर्षापासून जमिनीचा मालकी हक्क व जातीचा दाखला, नॉनक्रिमीलेअरसाठी लावलेली जाचक अट लवकरच दूर व्हावी यासाठी त्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊनच ते जिवतीतील सेवालाल महाराज जयंतीला उपस्थित झाले होते.
सेवालाल महाराजांची २७६ वी जयंती जिवती येथील जुन्या ग्रामपंचायत समोरील रंगमंचकावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळचे नवलकुमार राठोड, जवाहर राठोड, बी.जी. राठोड उपस्थित होते. सेवालाल महाराजांच्या जयंतीची सुरुवात पायदळ व मोटार सायकल रॅली काढून करण्यात आली. त्यात आपली परंपरेने चालत आलेली गिते सादर करून समाजबांधवांनी लोकांची मने जिंकली. कार्यक्रमाप्रसंगी बालाजी हायस्कुल शाळेतील विद्यार्थिनींनी बंजारा गीतावर सामूहिक नृत्य सादर करून संस्कृतीचे दर्शन घडविले. सायंकाळी शाहीर दौलत राठोड यांनी वेगवेगळ्या भाषेत समाज प्रबोधनपर गिते गायली. प्रास्ताविक जी.व्ही. राठोड व आपल्या समाजाच्या व्यथा अमर राठोड यांनी मांडल्या. संचालन राजेश राठोड यांनी तर आभार गजानन राठोड यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)