वनक्षेत्रातील गावांमध्ये वनऔषधी उत्पादनाचा प्रकल्प राबविणार
By Admin | Updated: September 5, 2016 00:56 IST2016-09-05T00:56:24+5:302016-09-05T00:56:24+5:30
निसर्गाची आवड असणाऱ्या तसेच ताडोबा-व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या जगातील गणमान्य अभ्यागतांची सुविधा व्हावी ...

वनक्षेत्रातील गावांमध्ये वनऔषधी उत्पादनाचा प्रकल्प राबविणार
चंद्रपूर : निसर्गाची आवड असणाऱ्या तसेच ताडोबा-व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या जगातील गणमान्य अभ्यागतांची सुविधा व्हावी तसेच वाघांच्या संवर्धनाचा येथून विचार व्हावा, यासाठी वनविभागाचे सुसज्य वनविश्रामगृह बांधण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
रामबाग वन वसाहतीच्या परिसरात सुमारे ४ कोटी ५२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या वन विश्रामगृहाच्या बांधकामाचा शुभारंभ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वन विभागातील पाच सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या हस्ते भूमिपुजन तसेच त्यांचा सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आ. नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, क्षेत्र संचालक जी.पी.गरड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, अधीक्षक अभियंता डी.के.बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जैस्वाल व पंचायत समिती सभापती बंडू माकोडे उपस्थित होते.
व्याघ्र संवर्धनाची संकल्पना मांडताना, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जगात केवळ १४ देशातच वाघांचे अस्तित्व असून नागपूर हे टायगर कॅरिडोर म्हणून ओळखले जाते. ३०० किलो मिटरच्या परिघात चारशे वाघ आहेत. सर्वोतम वाघ ताडोबा परिसरातील असल्यामुळे व निसर्गाची आवड असणाऱ्या जगातील नामवंत व्यक्ती चंद्रपूर ताडोबाला भेट देतात. त्यामुळेच रामबाग परिसरात वनविश्रामगृह बांधण्यात येणार असून हे विश्रामगृह येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल.
रोजगार निर्मितीमध्ये वनविभागाचा महत्वाचा सहभाग असल्यामुळे वनक्षेत्रातील गावांमध्ये वनऔषधी उत्पादनाचा प्रयोग राबविण्यात येणार असल्याचे सांगताना ना. मनगंटीवार म्हणाले, उत्तम प्राणवायू, पर्यटन आणि वनऔषधी समृध्द वनक्षेत्रातच उपलब्ध आहे. राज्यात जंगल टिकविण्यासाठी आदिवासींची महत्वाची भूमिका असून अशा गावांमध्ये वनविभागातर्फे विकासाच्या योजना राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सासंगितले.
दोन कोटी ८३ लक्ष वृक्ष लागवडीचा उपक्रम पूर्ण केल्यानंतर ५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष निर्धारीत केले आहे. या उपक्रमाची लिंमका बुकने दखल घेतली असून जगातील पाच रेकार्ड कायम केले असून चंद्रपूर जिल्हा विकासामध्ये राज्यात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी आमदार नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात चंद्रपूर वनक्षेत्रात ३०६ कोटी रुपयाचे विविध २२ कामे सुरु आहेत. जिल्ह्यात ११ निसर्ग उद्याने, जैवविविधता पार्क तसेच बांबुवर आधारीत संशोधन केंद्राची निर्मिती होत आहे. चंद्रपूर प्रमाणेच पोंभूर्णा येथे वनविश्रामगृह बांधण्यात येणार असून लेपर्ड सफारी, गौण वनावर आधारीत २८ लक्ष रुपये खर्चून वनधन केंद्र येत्या दीड महिन्यात सुरु होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
अमिताभ बच्चन येणार
पर्यावरणाचे सैनिक असलेल्या वनकर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी सुप्रसिध्द अभिनेते व व्याघ्र अँबेसेडर अभिताभ बच्चन यांनी ताडोबाला भेट देण्याचे मान्य केले आहे. वसुंधरेच्या सुरक्षेची जबाबदारी वनविभागाची असून वनविभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृह बांधण्यात येईल, अशी घोषणा यावेळी केली.