Immersion of 3 Ganesh idols in Chandrapur | चंद्रपुरात ८८४३ गणेशमूर्तींचे विसर्जन

चंद्रपुरात ८८४३ गणेशमूर्तींचे विसर्जन

ठळक मुद्देसकाळीच रस्ते स्वच्छ : तलावाचीही तत्काळ स्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गेल्या १० दिवसांपासून मोठ्या भक्ती भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला. विसर्जनाच्या दिवसापर्यंत एकूण ८८४३ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शनिवारी सकाळ होण्यापूर्वीच शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई केली. त्यानंतर दुपारच्या सुमारास रामाळा तलावातील मूर्तीचे लाकडे व इतर कचरा काढून तलाव स्वच्छ केला.
विसर्जनाच्या दिवशी चंद्रपूरकरांनी मोठया संख्येने बाहेर पडत लाडक्या बाप्पाला उत्साहाने निरोप दिला. याप्रसंगी गणेश विसर्जनाच्या मुख्य स्थळांकडे जाणारे रस्ते गदीर्ने फुलून गेले होते. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. महानगरपालिकेतर्फे जटपूरा गेटवरून बाप्पांवर पुष्पवृष्टी करून सर्व गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकींचे स्वागत करण्यात येत होते. शहरात ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला थाटात ढोल- ताशांच्या मिरवणुकीत वाजत-गाजत ‘गणपती बाप्पा, मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात मोठ्या भक्तीभावाने निरोप देण्यात आला.विसर्जनादरम्यान विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी रेन वॉटर हार्वेस्टींग, पर्यावरण रक्षण, वृक्ष लागवड, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध, प्रदूषण नियंत्रण याबाबत आकर्षक देखाव्याद्वारे जनजागृती केली. गणेश विसर्जन रात्री उशिरा २.३० वाजेपर्यंत सुरु असल्याने स्वच्छतेकरिता महानगरपालिका सफाई कर्मचारी सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत निरंतर कार्यरत होते.

चंद्रपुरात २४ डीजेवर कारवाई
गणेश विसर्जनादरम्यान ध्वनीप्रदूषण करणाऱ्या २४ डिजेवर चंद्रपूर रामनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री कारवाई केली. जिल्ह्यात पोलीस विभागाने कर्णकर्कश आवाजाने डीजे वाजविण्यावर बंदी घातली आहे. तरीही अनेक गणेश मंडळांनी गुरुवारी डिजेच्या मोठया आवाजात वाजतगाजत मिरवणूक काढली. मात्र चंद्रपूर पोलिसांनी ध्वनीप्रदूषण करणाºया डिजेविरुध्द विशेष मोहीम राबवत ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० नुसार २४ वाहनावर कारवाई केली. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हाके यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

Web Title: Immersion of 3 Ganesh idols in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.