तामसी घाटातून रेतीची अवैध वाहतूक सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:26 IST2021-03-25T04:26:31+5:302021-03-25T04:26:31+5:30
नांदाफाटा : कोरपना तालुक्यातील वर्धा नदीपात्रातील तामसी रेती घाटातून रात्रपाळीला जेसीबी पोकलेनद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन करण्यात ...

तामसी घाटातून रेतीची अवैध वाहतूक सुरूच
नांदाफाटा : कोरपना तालुक्यातील वर्धा नदीपात्रातील तामसी रेती घाटातून रात्रपाळीला जेसीबी पोकलेनद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन करण्यात येत आहे.
शासनाने काही दिवसांपूर्वी घाटाचे रितसर लिलाव केले. यामध्ये मनुष्यबळाद्वारे रेती उपसा करणे गरजेचे असल्याचे आदेशात म्हटले आहे. परंतु रेती माफिया आता चक्क जेसीबी व पोकलेनचा वापर करून रात्रपाळीला चारचाकी, सहाचाकी गाड्यामार्फत मोठ्या प्रमाणात वाहतूक करीत आहे. तामसी घाटामध्ये रेतीसाठा मोठ्या प्रमाणात आहे. याचाच फायदा घेत रेती माफियांनी वाहने जाण्याकरिता रेती घाटातून मोठा रस्ता तयार केला आहे. यामध्ये मोठी वाहने रात्रपाळीला जात असून साधारणतः १५ ते २० हायवा रेती घाटात उभ्या असलेल्या दिसून येते. यासंदर्भात प्रशासनाला माहिती असून देखील कुठलीही कारवाई अद्यापही करण्यात आलेले नाही. त्यामुळे रेती माफियांना प्रशासनाचे अभय असल्याचे आता जनमानसामध्ये बोलले जात आहे. एकीकडे तहसील प्रशासनामार्फत यापूर्वी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली होती. यात एक लाखापर्यंतचा दंड ट्रॅक्टर मालकांनी शासनाला भरून दिलेला आहे. यात मोठा महसूल शासन दरबारी जमा करण्यात आलेला होता. परंतु आता सर्रासपणे रात्री हायवा गाड्या चालत असताना देखील कुठलीही कारवाई होताना दिसत नाही.
बॉक्स
महसूल अधिकारी गप्प का?
तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी गप्प का असा सवाल आता नागरिक करीत आहे. एकीकडे ट्रॅक्टरवर अवैध वाहतुकीची कारवाई करायची आणि दुसरीकडे रेती भरून येणाऱ्या हायवा गाड्यांना सूट द्यायची, असा प्रकार राजरोसपणे कोरपना तालुक्यात सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चेला आता उधाण येत असून मोठी आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याचे बोलले जात आहे.
बॉकस
रात्रीस खेळ चाले...
दिवसभर रेती उत्खनन बंद ठेवून रेती घाट नजीक झुडपांमध्ये जेसीबी व पोकलेन दडवून ठेवली जात आहे. तर रात्रपाळीला बोरगाव, भोयेगाव, गाडेगाव मार्गे कोरपना तालुक्यात वेगळ्या ठिकाणी हायवा मार्फत रेती साठवली जात आहे. यामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होत असून नदीपात्रात रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
कोट
रेती घाटामध्ये जेसीबी पोकलेनद्वारे उत्खनन करणे नियमबाह्य आहे. असा प्रकार दिसून आल्यास रेतीघाट मालकावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.
- महेंद्र वाकलेकर,
तहसीलदार कोरपना.