लग्नाच्या वऱ्हाड्यांची ट्रकद्वारे अवैध वाहतूक
By Admin | Updated: May 18, 2015 01:24 IST2015-05-18T01:24:51+5:302015-05-18T01:24:51+5:30
लग्न सराईची धूम असल्याने ट्रकद्वारे वऱ्हाड्यांची अवैध वाहतूक होताना दिसत आहे.

लग्नाच्या वऱ्हाड्यांची ट्रकद्वारे अवैध वाहतूक
मूल : लग्न सराईची धूम असल्याने ट्रकद्वारे वऱ्हाड्यांची अवैध वाहतूक होताना दिसत आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताचे प्रमाण वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
मूल शहराबरोबरच तालुक्यातदेखील ट्रकद्वारे अशी अवैध वाहतूक जोमात सुरू असल्याचे दिसून आहे. मात्र यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. ज्यांच्यावर वाहतुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्या वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होऊ लागली आहे.
उन्हाळा म्हटला की उन्हाची दाहकता व त्याचबरोबर लग्नाची धूम बघायला मिळत असते. विशेषत: मे महिन्यात उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणात असल्याने अंगाची लाहीलाही होत असते. त्यातच लग्न म्हटले की, जीवाचा आटापिटा सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत नवरदेवाचे वऱ्हाड वधुमंडपी नेताना ट्रकमध्ये वऱ्हाड्यांना अक्षरश: कोंबून बसविले जाते. वाहनचालकाला थोडेफार पैशाचे आमिष दाखविले की क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना वाहनात बसविले जाते. अशावेळी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे आधीच ओव्हरलोड वाहन असते. त्यातही ते भरधाव वेगाने चालविल्याने अनेकदा अपघात घडले आहेत. वाहतूक शिपायाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र वाहतूक शिपाई त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अपघात घडतो. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत कोंबल्यास चालकाचे नियंत्रण कसे काय राहाणार? यासाठी ट्रकद्वारे लग्नाच्या वराती नेण्यास बंधने घातली पाहिजे आणि ट्रकची क्षमता लक्षात घेऊनच त्याच प्रमाणात प्रवासी नेण्यास पोलिसांनी बाध्य केले पाहिजे. यासाठी पोलीस प्रशासनाने गंभीर असणे आवश्यक आहे. अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)