गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST2021-02-05T07:38:07+5:302021-02-05T07:38:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंडपिपरी : गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात अवैध व्यावसायिकांनी डोके वर काढले असून, दारू तस्करी, नदी ...

गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात अवैध व्यावसायिकांनी डोके वर काढले असून, दारू तस्करी, नदी घाटातून वाळूचा उपसा, जुगार, सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री, स्वस्त धान्य, गूळ व तुरटी तस्करी आदी अनेक अवैध धंदे त्यांच्याकडून सुरू आहेत. पोलीस प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
वाढत्या अवैध धंद्यांमुळे तालुक्यातील सामाजिक आरोग्याला धोका निर्माण झाला असून, वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का, असा गंभीर प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे.
जिल्हा सीमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्याला लागून तेलंगणा राज्याची सीमा आहे. दारूबंदी काळापासून या तालुक्यात जलमार्गाने नावेच्या सहाय्याने तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सुरू आहे. तसेच मूल, वरोरा, चंद्रपूर, बल्लारशा येथून मुबलक प्रमाणात देशी दारूचाही पुरवठा तालुक्यात केला जात असल्याची माहिती आहे.
दारुच्या या महापुराच्या पाशात अडकलेल्या गोंडपिपरी तालुक्याला आता रेती तस्करी, गोवंश तस्करी, जुगार, तांदूळ तस्करी, तुरटी व गूळ तस्करी आदी विविध अवैध धंदे यांचे नव्याने ग्रहण लागलेले असून, युवा वर्गाचा प्रचंड प्रमाणात गुन्हेगारीकडे कल वाढल्याचे चित्र दिसत आहे. याबरोबरच गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात अगदी राजरोसपणे सुगंधित तंबाखूचा महिन्याकाठी कोट्यवधींचा काळाबाजार होत असून, चक्क तेलंगाना राज्यापर्यंत या तंबाखू तस्करांनी व्यवसाय विस्तारल्याचे कळते. रात्रीच्या सुमारास तालुक्यातील अंधारी, वैनगंगा नदी घाटातून तसेच नाले व वनहद्दीतून चोरटी रेती वाहतूकही सुरु आहे. एवढे सगळे उघडपणे होत असताना प्रशासकीय यंत्रणा मूग गिळून गप्प का, असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात आहे.