वनविभागाकडून अवैध सागवान जप्त
By Admin | Updated: April 17, 2017 00:38 IST2017-04-17T00:38:34+5:302017-04-17T00:38:34+5:30
या वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या बाळापूर तुकूम जंगलातील झाडांची अवैध कटाई करण्यात आली. ती लाकडे वन विभागाने शनिवारी जप्त केली आहेत.

वनविभागाकडून अवैध सागवान जप्त
तळोधी (बा) : या वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या बाळापूर तुकूम जंगलातील झाडांची अवैध कटाई करण्यात आली. ती लाकडे वन विभागाने शनिवारी जप्त केली आहेत.
बाळापूर तुकूम येथील गट क्र. ७ व गट क्र. ५/१ या खाजगी खसऱ्यातील साग झाडांना तोडीची परवानगी देण्यात आली होती. या खसऱ्यामध्ये काही झाडे नाल्यालगत असल्याने राखीवसुद्धा ठेवण्यात आली होती. या शेताच्या पंचनाम्यात तपासणीच्या वेळी अवैध कटाई झालेली नव्हती. त्याचे प्रमाणपत्र देण्यात आलेले होते. मात्र राखीव खसऱ्यातील नाल्यालगतची इतर झाडांची गुजेवाही येथील कंत्राटदार अरुण गुणशेट्टीवार यांनी अवैधरीत्या कटाई केली. त्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एच. सोनटक्के यांनी संबंधीत क्षेत्र सहायक ई.जी. नेवारे यांना कंत्राटदाराचा माल जप्त करण्याचा आदेश दिली. त्यानुसार, अवैध लाकडे जप्त करून सावरगाव येथील विक्री डेपोमध्ये जमा करण्यात आली आहे. वनविभागाकडून अवैध कटाई झालेल्या मालाची चौकशी करण्यात येत आहे. (वार्ताहर)