रेती घाटांवरून वाळूचा अवैध उपसा सुरूच

By Admin | Updated: February 14, 2016 00:53 IST2016-02-14T00:53:18+5:302016-02-14T00:53:18+5:30

चंद्रपूर तालुक्यातून वाहणाऱ्या नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा केला जात असून त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

The illegal sand mining continues on sand ghats | रेती घाटांवरून वाळूचा अवैध उपसा सुरूच

रेती घाटांवरून वाळूचा अवैध उपसा सुरूच

चंद्रपूर: चंद्रपूर तालुक्यातून वाहणाऱ्या नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा केला जात असून त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. असे असले तरी गेल्या ११ महिन्यांमध्ये वाळूची तस्करी करणाऱ्या ३१० वाहनांविरुद्ध कारवाई करून महसूल विभागाने संबंधित तस्करांना सुमारे ५५ लाखांचा दंड ठोठावला. पैकी २३ लाख रुपयांचा दंड तस्करांकडून आतापर्यंत वसुल करण्यात आला आहे.
चंद्रपूर तालुक्यातून वर्धा, इरई, झरपट, आणि अंधारी या नद्या वाहतात. यांपैकी घुग्घूस येथील वर्धा नदीतील नकोडा आणि अंधारी नदीतील गोंडसावरी या दोनच रेतीघाटांचे लिलाव झाले आहेत. उर्वरित रेतीघाटांना लिलावाची प्रतीक्षा आहे. लिलाव झाले नसले तरी वाळू तस्कर या नद्यांतील घाटांतून वाळू ओरबडून काढत आहेत. त्यातून पर्यावरणालाही मोठा बाधा पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूल विभागाकडून वाळू तस्करांविरुद्ध कारवाया सुरू असल्या तरी तस्करांपुढे महसूल विभागाची यंत्रणा दुबळी ठरत आहे. तालुक्यात सर्वाधिक तस्कर घुग्घूस परिसरात असून महसूल यंत्रणेच्या डोळ्यात धूळ झोकून हे तस्कर नद्यांमधून वाळू पळवित आहेत.
विशेष म्हणजे वाळू तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांनी तहसीलदार गणेश शिंदे व नायब तहसीलदार संतोष खांडरे यांच्या नेतृत्वात एका विशेष पथकाचे गठण केले आहे. हे पथक तस्करांवर पाळत ठेऊन असले तरी लिलाव न झालेल्या घुग्घूस घाटावरून मोठ्या प्रमाणावर रेतीची चोरी केली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The illegal sand mining continues on sand ghats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.