माजरी परिसरात अवैध रेती उत्खनन
By Admin | Updated: January 13, 2016 01:32 IST2016-01-13T01:32:03+5:302016-01-13T01:32:03+5:30
मागील दोन महिन्यांपासून शिरना नदी, कोंढा नाला, चालबर्डी नाला, पळसगाव व वर्धा नदीच्या घाटांवरुन अवैधरित्या रेती उत्खनन होत आहे.

माजरी परिसरात अवैध रेती उत्खनन
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : उन्हाळ्यात पाणी टंचाई भेडसावणार
माजरी : मागील दोन महिन्यांपासून शिरना नदी, कोंढा नाला, चालबर्डी नाला, पळसगाव व वर्धा नदीच्या घाटांवरुन अवैधरित्या रेती उत्खनन होत आहे. यामुळे जलस्तर घटत आहे. परिणामी येत्या उन्हाळ्यात या परिसरात जलसंकटाचा मोठा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात जनावरांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण होणार आहे. रेती चोरीमुळे शासनाच्या तिजोरीला चुना लागत आहे. त्यातून आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे परिसरात होत असलेल्या अवैध रेती उत्खननावर आळा बसवावा, अशी मागणी तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष रवी कुडदुला व सामाजिक कार्यकर्ते राजेश रेवते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
हे अवैध रेती उत्खनन मध्यरात्रीनंतर ते पहाटे दरम्यान होत असते. यापूर्वी तहसिलदार व पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली. मात्र कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.
वारंवार तक्रारी-विनंती करूनही कारवाई होत नाही. यामुळे रेती माफीयांसोबत स्थानिक पोलीस व महसूल विभाग यांची साठगाठ असल्याची शंका या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. रेती चोरीवर आळा बसवावा अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक, ना.हंसराज अहीर, आ. बाळू धानोरकर यांना पाठविण्यात आल्यात. (वार्ताहर)