जनावरांच्या औषधांची अवैधरित्या विक्री
By Admin | Updated: July 31, 2015 01:25 IST2015-07-31T01:25:04+5:302015-07-31T01:25:04+5:30
तालुक्यातील मौजा भंगाराम तळोधी येथे आंध्रप्रदेश राज्यातून जनावरांची औषधे खरेदी करुन ती तालुक्यात अनाधिकृतपणे विक्री केल्या जात आहे.

जनावरांच्या औषधांची अवैधरित्या विक्री
प्रशासनाकडे तक्रार : मात्र कारवाईत दिरंगाई, पत्रपरिषदेत आरोप
गोंडपिपरी : तालुक्यातील मौजा भंगाराम तळोधी येथे आंध्रप्रदेश राज्यातून जनावरांची औषधे खरेदी करुन ती तालुक्यात अनाधिकृतपणे विक्री केल्या जात आहे. विशेष म्हणजे, याबाबतची तक्रार चंद्रपूर येथील अन्न, औषध प्रशासन विभागाकडे केली असता तब्बल सात दिवसांनी तक्रारीची दखल घेण्यात येऊन थातूर-मातूर कारवाई करण्यात आली. त्यामुळे हा प्रकार सुरूच असून औषधांची अवैध विक्री करणाऱ्यास अभय दिला जात असल्याचा आरोप भंगाराम तळोधी मारोती येग्गेवार यांनी पत्रपरिषदेतून केला आहे.
तालुक्यातील मौजा भंगाराम तळोधी येथील मारोती अम्मावार नामक इसम गेल्या दोन ते तीन वर्षापासून आंध्रप्रदेश राज्यासह नजीकच्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व अन्य तालुक्याच्या पशुधन अधिकाऱ्यांकडून कमी दरात जनावरांचा औषधीसाठा आणून गावात अधिक भावाने विक्री करीत आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने याबाबत एका नागरिकाने २२ जुलै रोजी चंद्रपूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केली. मात्र संबंधित विभागाने सदर तक्रारीची उशिरा दखल घेतली. २७ जुलै रोजी विभागाचे निरीक्षक ग. क्र. नांदेकर यांनी भंगाराम तळोधी येथे भेट देऊन अनाधिकृतपणे औषधे विक्री करण्याचा आरोप असलेल्या मारोती अम्मावार यांच्या घरी धाड टाकली. काही औषधींची चाचपणी केली. मात्र सदर कारवाई करताना तक्रारीनंतर आठवडाभराहून अधिक कालावधी लोटल्याने औषध विक्री करणाऱ्याने जवळच्या साठयाची विल्हेवाट लावली. नंतर फक्त शेळी मेंढी पालनचा आपला व्यवसाय असल्याचे सांगून अशी अवैध विक्री करीत नसल्याचे सांगितले. तत्पूर्वी याच इसमाकडून मागील एक ते दोन वर्षापूर्वी भं. तळोधी येथीलच काही शेळ्या मेंढ्या पालनकर्त्या व्यवसायीकांनी औषधी खरेदी करुन जनावरांना दिल्याने शेकडो शेळ्यांना मृत्यूमुखी पडावे लागल्याची माहितीदेखील पत्रपरिषदेत देण्यात आली.
अन्न, औषध विभागाच्या निरीक्षक जी. के. नांदेकर यांनी हेतुपूरस्सरपणे संबंधितांवर कारवाई टाळण्यासाठी दिरंगाई करुन उलट तक्रारकर्ता व एका मेडीकल स्टोअर्सच्या मालकाला नाहक धारेवर धरत अवैध औषध विक्रेत्याला अभय दिल्याचा आरोप तंमुस अध्यक्ष संजय रामगोनवार यांनी केला आहे. तक्रार प्राप्तीनंतर संबंधित ठिकाणी भेट देऊन थातूर-मातूर पंचनामा करीत अवैध औषध विक्रेत्याची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. (तालुका प्रतिनिधी)