भद्रावती शहरात दारूची अवैध विक्री

By Admin | Updated: June 20, 2015 01:57 IST2015-06-20T01:57:17+5:302015-06-20T01:57:17+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होवून दोन महिने झाले. मात्र भद्रावती शहरात ठिकठिकाणी अवैध दारू विक्री जोमाने सुरु आहे.

Illegal sale of alcohol in the city of Bhadravati | भद्रावती शहरात दारूची अवैध विक्री

भद्रावती शहरात दारूची अवैध विक्री

पोलिसांचे दुर्लक्ष : प्रतिष्ठित नागरिकाकडून तस्करी
भद्रावती: चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होवून दोन महिने झाले. मात्र भद्रावती शहरात ठिकठिकाणी अवैध दारू विक्री जोमाने सुरु आहे. येथील विजासन रस्त्यावरील एका बियर बारमध्ये सर्रास दारूचा व्यवसाय सुरू असून येथीलच एक प्रतिष्ठित नागरिक वणीवरून दारू आणून येथील अवैध दारू विक्रेत्यांना ती पुरविण्याचे काम करीत असल्याची बाब समोर आली आहे.
१ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर संपूर्ण जिल्हाच दारूमुक्त होणार अशी अपेक्षा व्यक्त होत असताना नागरिकांची निराशा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलिसांनी सुरुवातीला एक महिन्याच्या कार्यकाळात विविध ठिकाणी अवैध दारू अड्डयांवर धाडी टाकून गुन्ह्याची शंभरी पार करुन १२० आरोपींना ताब्यात घेतले. मात्र आता १५ दिवसांचा कार्यकाळ पाहता मोठा साठा जप्त न करता थातूरमातूर कारवाई करुन पोलीस अट्टल दारू विक्रेत्याला मुभा देत असल्याची चर्चा आहे. येथील विजासन रस्त्यावरील बिअरबारमधून दारूची धडाक्याने विक्री सुरू आहे. शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती एका सहकाऱ्याच्या माध्यमातून मद्यपींना मोठ्या प्रमाणावर दारूचा पुरवठा करीत आहे. हा प्रकार सकाळी ११ वाजतापासून ते सायंकाळी १० वाजेपर्यंत सुरू राहत असल्याची माहिती येथीलच काही नागरिकांनी दिली. या बार मालकावर दोनदा अवैध दारू विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली असली तरी या पोलीस ठाण्यामध्ये नव्याने रुजू झालेल्या शिपायाचा मध्यस्तीने हा व्यवसाय चालत असल्याची चर्चा आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातून दारूचा साठा आणून भद्रावतीत पुरवठा करण्याचे काम येथीलच एक प्रतिष्ठित नागरिक एका महिन्यापासून करीत आहे. देशी-विदेशी दारूचा पुरवठा पेटीच्या हिशोबाने केला जात असून मद्यपींकडून मात्र तीनपट रक्कम घेतल्या जात आहे. पोलीस मात्र गावाबाहेरून होणाऱ्या दारू तस्करीवर थातूरमातूर कारवाई करुन आपला केलेली कारवाई योग्य असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांना भासवून येथील अट्टल दारू विक्रेत्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.
दारूबंदी करणारे पुढारी गावागावात दारू बंदी समित्या नेमून संपूर्ण जिल्हा दारू मुक्त करु अशा घोषणा करीत होते. मात्र दारुबंदी होवून तीन महिने लोटत असताना सुद्धा गावात तर सोडाच परंतु शहरात तरी दारूबंदी समित्या नेमल्या गेल्या नसल्याने वर्धा- गडचिरोलीपेक्षा चंद्रपूर जिल्ह्यात जास्त प्रमाणातत अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)
गोवरी परिसरात दारूची अवैध विक्री
गोवरी:राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या गोवरी परिसरात दारूची अवैध तस्करी करुन छुप्या मार्गाने सुरू आहे. मद्यपी आपली हौस भागविण्यासाठी ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा दुप्पट पैसे देऊन दारू पित आहे. यातून दारू विक्रेता चौपट नफा कमवित असल्याने नीट उभा होत असलेला सुखी संसाराचा डोलारा पुन्हा कोसळायला सुरुवात होणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही दारूची अवैध तस्करी नदीपट्ट्यातून सुरु असल्याने याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी होऊन अंमलबजावणी सुरुवात झाली. यात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामी यांच्यापासून सर्वसामान्य जनतेने दारूबंदीसाठी लढा उभारला. त्यातून यश पदरात पाडले. जिल्ह्याबाहेरुन दारूची तस्करी होऊ नये यासाठी राज्याच्या जिल्ह्याच्या सीमेवर पोलिस तपासणी नाका उभारण्यात आला. मात्र दारूबंदीचा अवैध दारुविक्रेत्यांनी सुरुंग लावत पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी नदीपट्ट्यातून आडमार्गाने दारूतस्करी करण्याचा सपाटा सुरु केला आहे. कोरपना तालुक्यातील पैनगंगा नदीच्या विरुर (गाडे) घाटावरुन विक्रेते दारुची अवैध तस्करी करीत असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

Web Title: Illegal sale of alcohol in the city of Bhadravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.