जैतापुरातील वनजमिनीवर अवैध उत्खनन

By Admin | Updated: February 9, 2016 00:45 IST2016-02-09T00:45:48+5:302016-02-09T00:45:48+5:30

राजुरा, कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दुर्लक्षित क्षेत्रातील जैतापूर येथे वनविभागाची जवळपास पाचशे एकर जमीन आहे.

Illegal quarrying of forest land at Jaitapur | जैतापुरातील वनजमिनीवर अवैध उत्खनन

जैतापुरातील वनजमिनीवर अवैध उत्खनन

वनविभागाची माती तलावाच्या कामी : तलावाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
राजुरा : राजुरा, कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दुर्लक्षित क्षेत्रातील जैतापूर येथे वनविभागाची जवळपास पाचशे एकर जमीन आहे. जैतापूर या गावाला निसर्गाने जणू खनीज संपत्तीची देणगी दिली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती असून या परिसरात सुरु असलेल्या शासकीय कामाकरिता कंत्राटदार येथील मागासलेपणाचा फायदा घेत गौण खनिजांची लूट करीत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषद लघुसिंचाई उपविभाग राजुरा अंतर्गत २०१३ मध्ये जैतापूर येथे गाव तलावाचे काम सुरु करण्यात आले. तेव्हापासून अजूनही तलावाचे काम पूर्ण झाले नाही. जे काम झाले तेही निकृष्ट दर्जाचे. यामुळे संबंधित कंत्राटदाराने उर्वरित काम करण्यासाठी चक्क वनविभागावर हल्ला चढविला असून येथून गौण खनिजांची लूट सुरु केली आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता संबंधित कंत्राटदार जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करीत आहे.
२० लाख ३९ हजार ६२ किंमतीचे जैतापूर येथील गावतलावाचे काम सागर कंत्राटदाराने घेतले असून येथील कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने मागील दोन वर्षापासून या तलावात पाण्याचा एक थेंबही जानेवारी महिन्यात राहत नसल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. येथील कंत्राटदाराने कामाचा दर्जा चांगला ठेवला असता तर गावालगत असलेल्या तलावाचा गावाला फायदा झाला असता. गावातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली असती. परंतु निकृष्ट कामामुळे जैतापूरवासीयांना उन्हाळ्यात पाणी प्रश्नाचा सामना करावा लागणार आहे.
तलावाच्या भिंतीला दगडाची सायडींग लावण्यासाठी वनविभागाच्या मातीचा वापर केला जात असून वनविभाग मात्र यापासून अनभिज्ञ आहे. यावर वनविभाग फक्त बघ्याची भूमिका घेत असून यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. जैतापूर परिसरात मागील दोन वर्षापासून महसूल विभागाच्या वनविभागाच्या जागेवरुन मुजोर कंत्राटदार गौण खनिजांची लूट करीत आहे. मागील वर्षी जैतापूर- नांदगाव रस्त्यावर गडचांदूर येथील कंत्राटदाराने अवैध उत्खनन करुन गिट्टी व मुरुम टाकला असून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला आहे. परंतु महसूल विभागाची कारवाई मंद गतीने झाल्याने तेही संशयाच्या भोवऱ्यात आहे. आता वनविभाग संबंधित कंत्राटदाराविरोधात काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Illegal quarrying of forest land at Jaitapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.