सिंतळा घाटावरून शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन

By Admin | Updated: April 25, 2016 00:45 IST2016-04-25T00:45:54+5:302016-04-25T00:45:54+5:30

मूल तालुक्यातील भेजगाव साझ्या अंतर्गत येत असलेल्या सिंतळा रेतीघाटावरून शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन सुरू असुन याकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

Illegal quarry of hundreds of brass sand from Cinta Ghat | सिंतळा घाटावरून शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन

सिंतळा घाटावरून शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन

प्रशासनाचे दुर्लक्ष : लाखोंचा महसूल पाण्यात
भेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव साझ्या अंतर्गत येत असलेल्या सिंतळा रेतीघाटावरून शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन सुरू असुन याकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे.
यापूर्वी भेजगावजवळील उमा नदी पात्रातून रेतीची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू होती. रेतीची तस्करी करताना गावातील मुख्य चौकातून ट्रॅक्टर चालविले जातात. याच मार्गावर तलाठी साझ्याचे कार्यालय आहे. तलाठी आत्राम यांनी या रेती तस्करांविरुद्ध कारवाईचा सुड उगवल्याने रेती तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले. परिणामी भेजगाव घाटावरील रेती तस्करीला काही प्रमाणात आळा बसला.
मात्र तस्करांनी रेती तस्करीसाठी नवी शक्कल लढवत छुप्या मार्गाचा शोध लावून चोरट्या मार्गावरून रेतीची तस्करी सुरू केली आहे. भेजगाववरून सिंतळा जवळपास १ किलोमिटर असुन येथील रेतीघाट आड मार्गावर आहे. याचाच फायदा घेत ट्रॅक्टरधारकांनी दिवसरात्र सिंतळा घाटावरून रेतीची अवैध तस्करी सुरू केली आहे. यातून शासनाचा हजारो रुपयांचा महसूल बुडत आहे.
यात शेकडो ब्रास रेतीचे अवैधपणे उत्खनन झाले असुन शासनाचा लाखो रुपये महसूल बुडत आहे, तर भेजगाव ग्रामपंचायतीने शेकडो एकर शेतजमिनीवर वनराई फुलविली. या वनराई जवळून वाढई यांच्या शेतातून विरई मार्गे मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करीत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
भेजगावजवळून उमा नदी लागून असून येथील नदीपात्र उच्च दर्जाच्या रेतीसाठी प्रसिद्ध आहे. प्रशासनाचावतीने या रेती घाटाचा लिलाव होतो. मात्र यावर्षी लिलाव न झाल्याने ट्रॅक्टरधारक मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध तस्करी करीत आहेत.
भेजगाव, सिंतळा, विरई या घाटावरून गडीसुर्ला, जुनासुर्ला, बेंबाळ, नवेगाव, नांदगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी होत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
तालुका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रेती तस्करांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Illegal quarry of hundreds of brass sand from Cinta Ghat