पोंभुर्णा येथील आष्टा घाटावरुन रेतीचे खुलेआम अवैध उत्खनन
By Admin | Updated: February 17, 2017 01:07 IST2017-02-17T01:07:05+5:302017-02-17T01:07:05+5:30
तालुक्यातील आष्टा रेती घाटावरुन नियमबाह्यरीत्या पोकलॅड, जेसीबी यंत्राद्वारे मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करुन वाहतूक केली जात आहे.

पोंभुर्णा येथील आष्टा घाटावरुन रेतीचे खुलेआम अवैध उत्खनन
अंधारात चालतात ओव्हरलोड वाहने : महसूल व पोलीस विभागाचे मधुर संबध
पोंभुर्णा : तालुक्यातील आष्टा रेती घाटावरुन नियमबाह्यरीत्या पोकलॅड, जेसीबी यंत्राद्वारे मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करुन वाहतूक केली जात आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. मात्र, राजरोसपणे अंधाराचा फायदा घेऊन ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या या रेती माफियांवर संबधित विभागाची कुठलीच कारवाई होत नसल्याने यात त्यांचे मधूर संबंध असल्याची खमंग चर्चा पोंभुर्णा तालुका परिसरामध्ये सुरु आहे.
पोकलॅन्ड व जेसीबीद्वारे रेती उत्खनन करण्याची परवानगी नसतानाही स्थानिक अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने ठेकेदार दिवसभर मशीनद्वारे रेतीचे उत्खनन करीत आहे. तसेच रात्रीच्या वेळी रेती वाहतूक करणे नियमबाह्य असतानाही सर्रास ट्रकांद्वारे ओव्हरलोड रेती भरुन वाहतूक केली जात आहे. सदर प्रकार संबंधीत विभागाचे महसूल व पोलीस विभागाचे डोळ्याने पाहूण सुद्धा त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. या विभागातील अधिकाऱ्यांचे ठेकेदारासोबत मधून सबंध असल्याची चर्चा परिसरामध्ये सुरु आहे.
तालुक्यामध्ये सध्या जि.प. व पं.स. निवडणुकीची धामधुम सुरु आहे. यासाठी महसूल व पोलीस विभागाची रात्रीच्या वेळी गस्त सुरु आहे. त्यांना हा प्रकार जाणवत नसावा का? असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. नियमबाह्य व अंधाराचा फायदा घेऊन प्रचंड रेती वाहतूक करुन गब्बर होत असलेल्या या ठेकेदारांवर कारवाई करुन शासनाचा लाखो रुपयाचा महसूल वाचविण्यात यावा, अशी परिसरातील जनतेची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)