आसापूर शिवारात अवैध गौण उत्खनन
By Admin | Updated: December 22, 2015 01:06 IST2015-12-22T01:06:55+5:302015-12-22T01:06:55+5:30
तालुका तहसील कार्यालयापासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर आसापूर शेतशिवाराला लागूनच गिट्टीचे अवैध

आसापूर शिवारात अवैध गौण उत्खनन
जिवती : तालुका तहसील कार्यालयापासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर आसापूर शेतशिवाराला लागूनच गिट्टीचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भरदिवसा उत्खनन करून त्याची वाहनांनी वाहतूक होत असते. पण महसूल अधिकारी, वनविभागाचे कर्मचारी याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करत असल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे, सदर गिट्टी व दगडाचे उत्खनन ज्याठिकाणी सुरू आहे, ते ठिकाण रस्त्याच्या कडेलाच पंधरा ते वीस मीटर अंतरावर लागून आहे. याच रस्त्यावरुन महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी दररोज तहसील कार्यालयात ये-जा करतात. पण त्यांना हा अवैधरित्या चालत असलेला प्रकार कधीच दिसला नाही.
जिवती तालुक्यात कुठेही गौण उत्खननासाठी परवाना मिळणार नाही, असे सक्त आदेश असताना तसेच वनविभाग आणि महसूल विभागाची नेमकी जागा कोणती हे निश्चित होणार नाही तोपर्यंत परवाना मिळणार नाही, असे शासकीय निर्देश आहेत. असे असताना तालुक्यात सर्रासपणे अवैध उत्खनन सुरू कसे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सहाजिकच अधिकाऱ्यांकडे अंगुलीनिर्देश केले जात आहे. विनापरवान्याने गाड्या भरुन जातात, शासनाचा महसूल बुडतो, हा गंभीर प्रकार असतानाही यासंदर्भात कारवाई मात्र शुन्य आहे.
नगराळा तलाठी साजा अंतर्गत आसापूर शेतशिवाराला लागून हे अवैध उत्खनन गेल्या वर्षभरापासून सुरू असून उत्खननामुळे याठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. प्रस्तूत प्रतिनिधीने याठिकाणी भेट दिली असता हे उत्खनन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या अगदी मागच्या बाजूला सुरू असल्याचे दिसून आले. शाळेच्या जवळच मोठमोठे खड्डे पडल्याने भविष्यात हे खड्डे विद्यार्थ्यांसाठी धोक्याचे ठरू शकतात, अशा प्रतिक्रिया या शाळेच्या शिक्षकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या आहेत. केवळ याच ठिकाणी नाही तर हा प्रकार संपूर्ण तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू आहे.
वनविभागाच्या जागेतूनही हा प्रकार होत असताना त्यांच्याकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्याच्या विकासाची भाषा करणारे महसूल अधिकारी बंदी असलेल्या परिसरातच अवैध उत्खनन कसे काय होऊ देतात, हा प्रश्न त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. यात शासनाचाही लाखोंचा महसूल बुडत आहे. याकडे लक्ष द्यावे. (शहर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांसाठी खड्डे धोकादायक
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसापूरच्या इमारतीच्या मागे व बाजूला हे अवैध गिट्टीचे उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे याठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले असून या खड्डयात पावसाळ्यात पाणी साचू शकते. परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी धोका उद्भवू शकतो, हे नाकारता येण्यासारखे नाही.