सुशीदाबगाव परिसरात दगड गिट्टीची अवैध वाहतूक
By Admin | Updated: March 1, 2015 00:48 IST2015-03-01T00:48:43+5:302015-03-01T00:48:43+5:30
तालुक्यातील सुशीदाबगाव- जामखुर्द मार्गावर दगड-गिट्टीची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. याकडे महसूल विभागाचे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे.

सुशीदाबगाव परिसरात दगड गिट्टीची अवैध वाहतूक
मूल : तालुक्यातील सुशीदाबगाव- जामखुर्द मार्गावर दगड-गिट्टीची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. याकडे महसूल विभागाचे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे. या मार्गावर ट्रॅक्टरद्वारे दगड-गिट्टी भरुन दररोज ट्रॅक्टर जात असतात. दरम्यान, केळझरचे क्षेत्र सहाय्यक विदेश गलगट यांनी एक ट्रॅक्टर थांबवून चौकशी केली असता, सदर ट्रक्टरचा वाहतूक परवाना हा १४ फेब्रुवारीचा असतानादेखील जवळपास एकाच परवान्यावर १४ दिवस ट्रॅक्टर चालविण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यासंदर्भात क्षेत्र सहायक विदेश गलगट यांनी मूलच्या तहसीलदारांना भ्रमणध्वनीद्वारे यासंदर्भात माहिती दिल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.
तालुक्यातील सुशीदाबगाव परिसरात अवैधरित्या खनीज संपत्तीची वाहतूक होत असून महसूल विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वन विभागाच्या एका अधिकाऱ्याला ही बाब निर्देशानास आली आहे. पकडण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा क्रमांक एम.एच. ३४ एल-९८९५ असा असून त्यात गिट्टी व दगड भरल्याचे आढळून आले. मात्र जो परवाना देण्यात आला तो दुसऱ्या ट्रॅक्टरचा असल्याचे आढळून आले आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गिट्टी व दगडांची वाहतूक होत असताना महसूल विभागाचे त्याकडे होणारे दुर्लक्ष शंका निर्माण करणारे आहे. पकडण्यात आलेले ट्रॅक्टर देवाजी सातपुते यांच्या मालकीचा असून सुशीदाबगावच्या तलाठ्याने कारवाई केली. याच मार्गावर रेती, मुरुम या सारख्या खनिजाचीही वाहतूक होत आहे. (तालुका प्रतिनिधी)