विशिष्ट साखळीच्या माध्यमातूनच जिल्ह्यात अवैध दारूचे पाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:48+5:302021-01-13T05:12:48+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. परंतु, आता याचे स्वरूप पालटले आहे. पूर्वी कोणीही या अवैध दारूच्या ...

विशिष्ट साखळीच्या माध्यमातूनच जिल्ह्यात अवैध दारूचे पाट
चंद्रपूर : जिल्ह्यात अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. परंतु, आता याचे स्वरूप पालटले आहे. पूर्वी कोणीही या अवैध दारूच्या व्यवसायात उतरत होता. आता ही विक्री नियोजनबद्ध एका विशिष्ट साखळीच्या माध्यमातूनच होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. या सगळ्या प्रकारात स्थानिक गुन्हे शाखेचा एक जुना कर्मचारी अर्थपूर्ण व्यवहार करीत असल्याचेही समजते. या शिपायावर यापूर्वी ४२० चा गुन्हा दाखल झाला आहे. तो या व्यवहारात निपुण असल्याने त्याला पुन्हा बोलावण्यात आल्याचे सूत्राने सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. सरकार बदलताच ही दारूबंदी हटविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दारूबंदी हटणार वा नाही, हे पुढील काही महिन्यांत लक्षात येईलच. परंतु, दारूबंदी हटेपर्यंत अवैध दारूच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमविण्याची नामी शक्कल लढविली जात आहे. यामध्ये दारू कुठून आणायची. ती किरकोळ विक्रेत्यापर्यंत कोणी पोहोचवायची. त्याचा मार्ग कोणत्या ठाण्याच्या हद्दीतून जाईल. किरकोळ विक्रेते कोण असणार, ही साखळीच अवैध दारू विक्रीसाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेचा एक जुना कर्मचारी करीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
या साखळीत प्रत्येक पातळीवर दारूचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. ज्याची दारू जिल्ह्यात आणली जाते. तो आपल्या पातळीवर यंत्रणेला मॅनेज करतो. दारू पोहोचविणाऱ्याचीही दलाली ठरली आहे. शिवाय, स्थानिक पातळीवर दारू घेणाऱ्यांकडून दर निश्चित केलेले आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याची माहिती आहे. अपेक्षित नफा मिळत नसल्याची किरकोळ विक्रेत्याची ओरड ऐकायला येत आहे.
केवळ त्या विक्रेत्यांवरच होणार कारवाई
जो दारूविक्रेता या साखळीत राहून दारू विकणार नाही. अशा दारू विकणाऱ्यांवर पाळत ठेवून त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याची धक्कादायक माहिती माहितीगार सूत्राने ‘लोकमत’ला सांगितली. यापूर्वी या साखळीत असलेल्या एका व्यक्तीने तोडीनुसार रक्कम पोहोचती केली नसल्याने दारू पोहोचिवण्याचे काम त्यांच्याकडून काढून अन्य व्यक्तीला दिल्याचेही सूत्राने सांगितले.
डुप्लीकेट दारूपासून सावधान
दारूची विक्री करणाऱ्या या साखळीत जादा नफा कमविण्याच्या हव्यासापोटी काही भागात डुप्लीकेट दारू मद्यपींपर्यंत पोहोचविली जात असल्याची धक्कादायक माहिती एका दारू विक्रेत्याने ‘लोकमत’ला दिली. ही दारू अत्यल्प दरात उपलब्ध होते. त्याबदल्यात चार ते पाचपट नफा कमविला जात असल्याचे समजते.
दारूसाठी नाकेच हटविले
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली होती. आता हे नाके हटविण्यात आले आहेत. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात दारू आणण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. ही बाब सुज्ञ नागरिकांसह सामान्यांनाही आश्चर्यचकित करणारी ठरत आहे.