घाटावरून रेतीचा अवैध उपसा
By Admin | Updated: November 6, 2014 01:19 IST2014-11-06T01:19:29+5:302014-11-06T01:19:29+5:30
तालुक्यातील धानोरा महसूली साज्यांतर्गत येत असलेल्या नलफडी घाटावरून मोठ्या प्रमाणावर रेतीचा अवैधरित्या उपसा केला जात आहे.

घाटावरून रेतीचा अवैध उपसा
राजुरा : तालुक्यातील धानोरा महसूली साज्यांतर्गत येत असलेल्या नलफडी घाटावरून मोठ्या प्रमाणावर रेतीचा अवैधरित्या उपसा केला जात आहे. या नाल्यातून दररोज शेकडो ब्रास रेतीची अवैधपणे उचल करण्यात येत आहे. हा गोरखधंदा मागील काही दिवसांपासून अविरतपणे सुरु असला तरी महसूल विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
या घाटावरून अनेकदा रेतीची चोरी होऊनदेखील एकही कारवाई झाली नाही. त्यामुळे या गोरखधंद्यात महसूल विभागातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचे हात ओले होत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. रेतीच्या चोरीमुळे शासनाचा हजारो रुपयांचा महसूल बुडत आहे. पण महसूल अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसल्याने त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राजुरा तालुक्यात अनेक रेतीघाट आहेत. राजुरा, धोपटाळा, कापनगाव, टेंबूरवाही, विहीरगाव, नलफडी, कवीठपेठ, विरुर स्टेशन, खांबाडा यासह इतर रेतीघाटांच्या लिलावातून शासनाला लाखोंचा महसूल प्राप्त होतो. पण खांबाडा घाट वगळता मागील काही वर्षांपासून एकाही घाटाचा लिलाव झाला नसल्याने ही बाब माफियांच्या पथ्यावर पडत आहे. या गोरखधंद्यासाठी माफिया हप्ता देत असल्याने त्यांना खुली सूट देण्यात येत आहे.
या संधीचा फायदा घेत माफियांनी अक्षरश: नाल्याची पुरती वाट लावली आहे. रेतीमाफियांनी विहिरगाव घाटातील शेकडो ब्रास रेतीवर डल्ला मारल्यानंतर आता त्यांनी नलफडी घाटावर हल्लाबोल केला आहे. हा घाट जंगलाला लागून असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. याच संधीचे सोने करण्यासाठी माफियांनी घाटात धुडगूस घातला आहे. चार-पाच माफियांच्या अंदाजे सहा ट्रकमधून राजरोसपणे रेतीचा उपसा करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना हप्ता देतो या तोऱ्यातत त्यांची अरेरावी सुरु आहे. अंदाजे एक किमीपर्यंतचा नाला खोदून काढला आहे.
आजतागायत या साज्याच्या तलाठ्याने एकाही ट्रकवर कारवाई केल्याचे दिसून येत नाही. या धंद्यात त्यांचे हातसुद्धा ओले असल्याची चर्चा आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना न देता फिल्डिंग लावून या माफियांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)